आवृत्ती पुणे
← Back to Homepage

टेम्पो चोरून नेणारे सराईत गुन्हेगार जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Social News, News, News Slider, Police, Social • May 5, 2026
Spread the love

पुणे : निगडी येथील त्रिवेणीनगर येथे पार्क केलेला टेम्पो कात्रीच्या साहाय्याने सुरू करून तो चोरून फुरसुंगीला आलेल्या दोघा सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने टेम्पोसह पकडले.

कन्हैयासिंग कालुसिंग टाक (वय ३३) आणि राजेशसिंग नानकसिंग दुधानी (वय ४८, दोघे रा. तुळजा भवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर) अशी पकडलेल्या दोघा सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

त्यांच्यावर यापूर्वी वाहनचोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड व त्यांचे सहकारी ४ मे रोजी फुरसुंगी परिसरात पेट्रोलिंग करत होते.

त्यावेळी पोलीस अंमलदार प्रशांत कर्णवर व नानासाहेब मोरे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, फुरसुंगी पॉवर हाऊस येथे दोघे जण छोटा हत्ती टेम्पो घेऊन थांबले आहेत. तो टेम्पो बहुधा चोरीचा आहे.

माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध घेतल्यावर पॉवर हाऊस पुलाखालील रस्त्यावर टेम्पोजवळ दोघे जण थांबलेले दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी त्रिवेणीनगर येथून कात्रीच्या साहाय्याने टेम्पो सुरू करून चोरला असून तो सासवडला घेऊन जात होतो, अशी कबुली दिली. दोघांना टेम्पोसह चिखली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मिसाळ, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस अंमलदार प्रशांत कर्णवर, तानाजी देशमुख, नानासाहेब मोरे, बाळासाहेब सकटे, प्रमोद टिळेकर, अमित कांबळे, गणेश माने, शेखर काटे, उमेश शेलार, पल्लवी मोरे, मनिषा लोखंडे व अनिल जामगे यांनी केली.

टेम्पो चोरीचा मालकाला पत्ताच नाही
पोलिसांनी पकडलेल्या टेम्पो नंबरवरून टेम्पो मालकाला फोन केला.
पोलीस : कर्नाटक पासिंगचा हा टेम्पो आपल्या मालकीचा आहे का?
मालक : हो, माझ्याच मालकीचा आहे. इथे घराखाली पार्क केला आहे.
पोलीस : हा टेम्पो चोरट्यांनी चोरून सासवडला घेऊन जात होते, आम्ही तो फुरसुंगीजवळ पकडला आहे.
तेव्हा टेम्पो मालक खाली जाऊन पाहतो तर टेम्पो जागेवर नव्हता.