PSI अजित बडे, रील स्टार सोनाली हिंगेसह तिघे बडतर्फ
प्राचार्यांना धमकावून खंडणी उकळणे भोवले : खंडणीचा गुन्हा झाला होता दाखल
पुणे : पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून बदनामी करण्याची धमकी देऊन प्राचार्यांकडून ७ लाखांची खंडणी उकळणारे पोलीस उपनिरीक्षक अजित त्र्यंबक बडे, पोलीस अंमलदार सोनाली गुलाबराव हिंगे आणि सुदाम बाळकृष्ण तायडे यांना अपर पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी पोलीस दलातून बडतर्फ केले आहे.
हे तिघेही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नियुक्त असताना हा प्रकार २०२४ मध्ये घडला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर गेल्या महिन्यात तिघांना निलंबित करण्यात आले होते.
एका प्राचार्यांना अल्पवयीन मुलीने तुमच्या विरोधात तक्रार दिली आहे. तुमच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होईल, तुमची आणि संस्थेची बदनामी होईल, अशी भीती दाखविण्यात आली.
त्यासाठी त्यांनी एका अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीकडून तक्रार अर्ज लिहून घेतला होता. अटकेची व बदनामीची भीती दाखवून प्राचार्यांकडून ७ लाखांची खंडणी उकळली होती.
या प्रकरणातील अल्पवयीन मुलीला पश्चाताप झाल्याने तिने आई-वडिलांसह पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन त्यांना हा सर्व प्रकार सांगितला.
त्यानंतर गुन्हे शाखेने तपास करून अजित बडे, सोनाली हिंगे, सुदाम तायडे यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
तक्रारदारास गंभीर स्वरूपाच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे उकळण्यात आल्याचे प्राथमिक चौकशी अहवालावरून निदर्शनास आले असून, पोलीस दलाची प्रतिमा मलिन होऊन पोलिसांवरील विश्वासाला धक्का बसलेला आहे.
उपलब्ध माहितीवरून तिघेही फरार असून आपल्या पत्त्यावर उपलब्ध नाहीत. त्यामुळे विभागीय चौकशी अवाजवी रीतीने लांबण्याची शक्यता आहे.
त्यामुळे पोलीस प्रशासनावरील जनतेच्या विश्वासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तिघेही पोलीस दलातील सदस्य असल्यामुळे साक्षीदारांवर, विशेषत: अल्पवयीन साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याची, धमकाविण्याची किंवा प्रलोभन दाखवण्याची व त्यायोगे विभागीय चौकशी प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्याची शक्यता आहे.
ही बाब विचारात घेता, या प्रकरणात नियमित विभागीय चौकशी चालविणे वाजवीरित्या शक्य नाही. त्यामुळे सार्वजनिक व्यापक लोकहिताच्या तसेच जनतेचा पोलिसांवरील विश्वास टिकून राहावा, या दृष्टिकोनातून शासकीय सेवेत यापुढे कर्तव्यार्थ ठेवणे उचित होणार नाही, याची खात्री झाल्याने त्यांना तात्काळ बडतर्फ करण्यात येत असल्याचे अपर पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी
आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल होत असल्याची कुणकुण लागताच हे तिघे फरार झाले होते. त्यानंतर त्यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्याच्या सुनावणीच्या वेळी आरोपींच्या वकिलांनी वेळ मागून घेतली होती. त्यामुळे पुढे ढकललेली अटकपूर्व जामिनावरील सुनावणी बुधवारी होणार आहे. लाच घेताना सापडल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहायक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार आणि पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे यांना सोमवारी निलंबित केले होते. त्यापाठोपाठ मंगळवारी तिघांना पोलीस दलातून बडतर्फ केल्याने शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.