आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पत्नीचे शिर धडावेगळे करून फिरणाऱ्या नराधमाला जन्मठेप

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 7, 2026
Spread the love

पुणे : चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचे शिर कुऱ्हाडीने धडावेगळे करून कात्रज परिसरात फिरणाऱ्या नराधम पतीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुमीत जोशी यांनी जन्मठेप आणि ७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

रामचंद्र शेहू चव्हाण (वय ६३, रा. सुखसागरनगर, कात्रज, मूळ रा. उरनूर, गुलबर्गा, कर्नाटक) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

चारित्र्याच्या संशयातून त्याने पत्नी सोनाबाई चव्हाण (वय ५५) हिचा ९ ऑक्टोबर २०१५ रोजी निर्घृण खून केला होता. याबाबत आरोपीची सून सुनीता रमेश चव्हाण हिने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

चव्हाण हा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्याने पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केला.

त्यानंतर तिचा मृतदेह ओंडक्यावर ठेवला. कुऱ्हाडीने पत्नीचे हात-पाय आणि शिर वेगळे केले. पुरावा नष्ट करण्यासाठी शिर आणि रक्ताने माखलेली कुऱ्हाड हातात घेऊन तो कात्रज तलावाच्या दिशेने निघाला होता.

त्यावेळी गस्त घालणाऱ्या एका पोलिसाने आरोपीला पाहिले. त्याला ताब्यात घेऊन भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून २४ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली.

प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेली आरोपीची सून, शेजारी, शाळकरी मुलगी आणि चहा विक्रेती महिलेची साक्ष या खटल्यात महत्त्वाची ठरली.

न्यायालयाने साक्ष तसेच पुरावे ग्राह्य धरून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यात आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांनी पाठपुरावा केला.

या खटल्याच्या कामकाजासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, पोलीस निरीक्षक कैलास कोडग, उपनिरीक्षक रमेश चौधरी, जितेंद्र सोनवणे, विशाल मदने, रेखा मोटे यांनी सहाय्य केले.