आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

तरुणीचा गळा दाबून खून करून रस्त्यात टाकून दिला मृतदेह

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 7, 2026
Spread the love

पुणे : ब्युटी पार्लरचे काम करणाऱ्या तरुणीचा गळा दाबून खून करण्यात आला. त्यानंतर तिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

आफरीन सलीम पठाण (वय २९, रा. वडगाव शेरी गावठाण) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. हा प्रकार बुधवारी रात्री सव्वा नऊ ते गुरुवारी मध्यरात्री पाऊण एकच्या दरम्यान केशवनगर येथील कचरा डेपोजवळील रस्त्यावर घडला.

याबाबत तिच्या लहान बहिणीने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफरीन पठाण हिचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय होता.

तिला ग्राहकांकडून जशा ऑर्डर मिळतील, त्यानुसार ती त्यांच्या घरी जाऊन पार्लरचे काम करत असे. त्याप्रमाणे ती बुधवारी सकाळी ब्युटी पार्लरच्या कामासाठी घरातून बाहेर पडली होती. मात्र, ती रात्री घरी परतली नव्हती.

दरम्यान, तिचा मृतदेह मध्यरात्रीच्या सुमारास केशवनगर येथील कचरा डेपोलगतच्या रस्त्यावर पडलेला आढळून आला. तेथून जाणाऱ्या नागरिकांनी येथे एक मुलगी पडल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तिच्या अंगावर झटापटीच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. त्यामुळे प्रथमदर्शनी पोलिसांना या तरुणीला एखाद्या वाहनाने धडक दिली असावी, असे वाटले.

तिचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. डॉक्टरांनी तिचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर तिच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

तिचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला, त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. मुंढवा पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके आरोपींचा शोध घेत असून पोलीस निरीक्षक सागर गोडे पुढील तपास करीत आहेत.