तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून
मुंढव्यातील बी. टी. कवडे रोडवरील घटना : पोलिसांनी अल्पवयीन मुलाला घेतले ताब्यात
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मोकळ्या जागेत बिअर पीत बसले असताना झालेल्या वादातून तरुणाच्या डोक्यात व तोंडावर दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
लोकेश मानसिंग टेंबरे (वय ३०, रा. घोरपडी, मूळ रा. खांडेगाव, जि. नागपूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस अंमलदार प्रदीप पांडे यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही घटना घोरपडी येथील भाग्यश्रीनगरमधील लेन नंबर २, बी. टी. कवडे रोड येथील झेंडे यांच्या मालकीच्या मोकळ्या प्लॉटमध्ये ७ मे रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकेश टेंबरे हा मूळचा नागपूर येथील रहिवासी आहे.
त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला आहे. तो अहमदाबाद येथील एका मॉलमध्ये काम करत होता. सात महिन्यांपूर्वी त्याची पुण्यातील मॉलमध्ये बदली झाली होती. गेल्या अडीच महिन्यांपासून तो घोरपडी येथे राहत होता.
लोकेश व त्याचा अल्पवयीन मित्र हे दोघे ६ मे रोजी रात्री बी. टी. कवडे रोडवरील झेंडे यांच्या मालकीच्या मोकळ्या प्लॉटमध्ये बिअर पिण्यास बसले होते. त्यावेळी त्यांच्यात कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. या वादातून अल्पवयीन मुलाने टेंबरे यांच्या डोक्यात व तोंडावर दगड घालून त्यांचा खून केला.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. त्याच्याकडे असलेल्या आधार कार्ड व मोबाईलमधील माहितीवरून त्याची ओळख पटली.
त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधल्यानंतर धनकवडी येथील एका मित्राने त्याच्याविषयी माहिती दिली. त्यानंतर मुंढवा पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले पुढील तपास करीत आहेत.
