महापालिकेत नोकरीचा बहाणा : दागिने गहाण ठेवून दिले ५ लाख रुपये
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : हडपसर पोलीस ठाणे, युनिट ५ मध्ये पोलीस अधिकारी असल्याचे सांगून नातीला महापालिकेच्या जन्म-मृत्यू खात्यात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून एका तोतयाने महिलेची ५ लाख रुपयांची फसवणूक केली.
केतन दादासाहेब साळुंखे (वय ४०, रा. कुशल वाटिका सोसायटी, लोणी काळभोर) असे या तोतयाचे नाव आहे. याबाबत एका ६० वर्षीय महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार खराडी पोलीस ठाण्याबाहेर आणि कृष्णा हॉटेल येथे २ एप्रिल २०२६ रोजी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व केतन साळुंखे यांची ओळख सोशल मीडिया फेसबुकवर झाली. केतन साळुंखे याने आपण हडपसर पोलीस ठाणे, युनिट ५ येथे पोलीस असल्याचे सांगितले. तसेच कधी कधी मंत्रालयातही काम करतो, असेही तो सांगत असे.
त्याने मोठमोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ओळख असल्याचे सांगून मी नोकरी लावण्याचे काम करतो, तुमचा कोणी मुलगा किंवा मुलगी असेल तर सांगा, त्यांना महापालिकेच्या जन्म-मृत्यू दाखल्यांच्या विभागात नोकरी लावतो, असे सांगितले. फिर्यादी यांच्या मुलीच्या मुलीला नोकरीची आवश्यकता होती.
२ एप्रिल २०२६ रोजी केतन साळुंखे याने त्यांना फोन करून पैसे घेऊन खराडी पोलीस ठाण्याबाहेर बोलावले. त्या रिक्षाने तेथे गेल्या. तेथून ते कृष्णा हॉटेलमध्ये गेले. त्याने दिलेल्या फाईलमध्ये त्यांनी ३ लाख रुपये ठेवले. त्यानंतर ८ एप्रिल रोजी त्यांनी चाकण सहकारी पतसंस्थेत सोन्याचे दागिने गहाण ठेवून २ लाख रुपये घेतले आणि ते केतन साळुंखे याला पाठविले.
त्यानंतर त्याने ससून रुग्णालयात नातीला मेडिकलसाठी घेऊन या, असे सांगितले. त्यानुसार १८ एप्रिल रोजी त्या नातीला घेऊन ससून रुग्णालयात गेल्या. मात्र, केतन साळुंखे आला नाही आणि त्याचा फोनही बंद लागत होता.
त्यांनी हडपसर पोलीस ठाणे व गुन्हे शाखा युनिट ५ येथे जाऊन चौकशी केली. तेव्हा केतन साळुंखे असा कोणी पोलीस अधिकारी नसल्याचे समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक घुले तपास करीत आहेत.




