आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अल्पवयीनाकडून गावठी पिस्टल, जिवंत काडतूस जप्त

Spread the love

पुणे : फुरसुंगी परिसरात कमरेला पिस्टल लावून फिरणाऱ्या अल्पवयीन सराईत गुन्हेगाराकडून खंडणी विरोधी पथकाने एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. हा सराईत बालगुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत.

खंडणी विरोधी पथक २२ एप्रिल रोजी पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना बातमीदारामार्फत समजले की, आदर्श नगर ते उरुळी देवाचीकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारील मोकळ्या जागेत एक जण कमरेला पिस्टल लावून फिरत आहे.

या माहितीनुसार पोलिसांनी तेथे जाऊन या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडील एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त केले. फुरसुंगी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्या सूचनेनुसार पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, प्रदीप परीट, दयानंद गायकवाड यांनी केली आहे.