महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : व्यावसायिकाच्या कार्यालयातील कामगाराने १० लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कामगाराविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत दिलीप पुखराज ओसवाल (वय ५७, रा. वर्धमानपुरा, गंगाधाम चौक) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अखिलेश बसंतलाल वर्मा (रा. पुरोह, प्रयागराज, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना फिर्यादी यांच्या शुक्रवार पेठेतील कार्यालयात १४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे शुक्रवार पेठेतील सुभाषनगर परिसरात कार्यालय आहे. आरोपी त्यांच्याकडे कामाला होता. १४ एप्रिल रोजी आरोपीने व्यावसायिकाच्या कार्यालयात ठेवलेली १० लाखांची रोकड चोरली. रोकड चोरून तो पसार झाला.
व्यावसायिकाने त्याचा शोध घेतला तसेच मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. चौकशीत आरोपी पसार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे तपास करत आहेत.















