आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दोन पोलीस हवालदार निलंबित

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 8, 2026
Spread the love

पुणे : कोम्बिंग ऑपरेशनची ड्युटी असल्याचे सांगून प्रत्यक्षात पबमध्ये महिलेसोबत दारू पित बसलेला असताना पकडल्याने पत्नीचा छळ करणाऱ्या पोलीस हवालदाराविरुद्ध काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तसेच लाच घेताना पकडल्याने गुन्हा दाखल झालेल्या अशा दोन पोलीस हवालदारांना पुणे शहर पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे. पोलीस हवालदार हनुमंत गुलाब कांबळे (रा. पीरवस्ती, वडकी) आणि गणेश शहाजी कस्पटे अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

हनुमंत कांबळे हा काळेपडळ पोलीस ठाण्यात नियुक्तीस होता, तर गणेश कस्पटे हा कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात नियुक्तीस होता. हनुमंत कांबळे याच्याविरुद्ध त्याच्या पत्नीने कौटुंबिक छळाची फिर्याद काळेपडळ पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हनुमंत कांबळे याला १२ व ९ वर्षांची दोन मुले आहेत. असे असताना तो एका महिलेशी अनैतिक संबंध ठेवत होता. घरी येण्यास उशीर झाल्यावर तो, “मला तपास लागला आहे, मला मयत लागले आहे, मी ससूनमध्ये आहे,” अशी कारणे सांगत असे. पत्नीने त्याचा मोबाईल तपासल्यावर तो एका महिलेसोबत चॅटिंग करत असल्याचे दिसून आले.

१५ जून २०२६ रोजी पत्नीने हनुमंत कांबळे याला रात्री फोन केल्यावर त्याने कोम्बिंगची ड्युटी असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात तो पिंपरी-चिंचवड येथील सी डॉक या पबमध्ये त्या महिलेसोबत दारू पित बसला होता. पत्नीने तेथे जाऊन जाब विचारल्यावर, “मी पोलीस आहे.

माझे काही होणार नाही. तू काही करू शकत नाही,” असे तो बोलला. त्यानंतर त्याने, “मी पुन्हा असे वागणार नाही. मी सुधारलो आहे,” असे सांगितले.

उंड्री येथे या दोघांना एका फ्लॅटमध्ये पत्नीने सासू व दीरासमक्ष पकडले होते. तरीही त्याने या महिलेला उंड्री येथील न्यातीजवळील एका अपार्टमेंटमध्ये घर घेऊन दिले. पत्नीचे गहाण ठेवलेले सोने सोडवून घेऊन त्याने या महिलेला दुचाकी घेऊन दिली.

५ मे २०२६ रोजी रात्रपाळीची ड्युटी करून हनुमंत कांबळे हा घरी न आल्याने पत्नी त्या महिला राहत असलेल्या घरी गेली. तिने दार वाजविल्यानंतरही दार उघडले गेले नाही.

तेव्हा घरमालकाने येथून गॅलरीतून एक पोलीस उडी मारून गेल्याचे सांगितले. त्यावेळी तिने जाब विचारल्यावर, “तू तिथे कशाला तमाशा करायला गेली आहेस? मी तुला मारीन. मला तुझ्यासोबत राहायचे नाही.

मी तुला घटस्फोट देईन,” अशी धमकी दिली. त्यानंतर पत्नीने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून डॉ. सागर कवडे यांनी हनुमंत कांबळे याला निलंबित केले आहे.

चेक बाऊन्सच्या केसमध्ये नॉन-बेलेबल वॉरंट न बजावण्यासाठी पाच लाखांची खंडणी उकळल्यानंतरही अडीच लाखांची मागणी करून दीड लाख रुपये घेताना पोलीस हवालदार गणेश कस्पटे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले होते.

कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला १० मेपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. गणेश कस्पटे याला पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी निलंबित केले आहे.