बार्शी शहर पोलीस ठाण्याची सामाजिक कार्यात कौतुकास्पद कामगिरी
हरवलेल्या पाच वर्षीय चिमुकल्यास काही तासांत आईच्या स्वाधीन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : बार्शी बस स्थानक परिसरात हरवलेल्या पाच वर्षीय मुलास बार्शी शहर पोलिसांनी तत्परतेने शोधून काढत त्याला सुखरूपपणे आईच्या ताब्यात दिले. डायल ११२ सेवा, सोशल मीडिया आणि पोलिसांच्या जलद हालचालीमुळे ही कौतुकास्पद कामगिरी शक्य झाली असून नागरिकांकडून बार्शी शहर पोलिसांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
बार्शी शहरातील गजबजलेल्या बस स्थानकात सकाळची वेळ होती. सकाळी सुमारे ११.०० वाजण्याच्या सुमारास डायल ११२ वर कॉल प्राप्त झाला की, बार्शी बस स्थानक येथे एक पाच वर्षांचा मुलगा एकटाच आढळून आला असून त्याच्यासोबत कोणतेही नातेवाईक नाहीत.
तत्काळ डायल ११२ वरील कर्मचारी पोकॉ मोहन कदम यांनी सदर माहिती पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांना दिली. त्यानंतर मोहन कदम यांनी बस स्थानक येथे जाऊन हरवलेल्या मुलास ताब्यात घेतले व त्यास बार्शी शहर पोलीस ठाण्यात आणले.
मुलाची विचारपूस केली असता त्याने तोकड्या शब्दांत आपले नाव “अदिराज औदुंबर कुंभार” असे सांगितले. त्यानंतर मुलाच्या आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी तात्काळ प्रयत्न सुरू करण्यात आले.
सोशल मीडिया व व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मुलाच्या आईचा मोबाईल क्रमांक प्राप्त करण्यात आला व त्यांना त्यांचा मुलगा बार्शी शहर पोलीस ठाण्यात सुखरूप असल्याची माहिती देण्यात आली.
सदर मुलाची आई दिपाली औदुंबर कुंभार, रा. कसई, ता. तुळजापूर या परंडा येथून बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. आपल्या मुलाला पाहताच त्यांना अश्रू अनावर झाले.
स्वतःला सावरत त्यांनी आपल्या मुलाला मिठी मारली. त्यानंतर आई व मुलास पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या समक्ष हजर करण्यात आले.
पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी मुलाच्या आईस लहान मुलांची योग्य काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले व सदर मुलास सुखरूपपणे आईच्या ताब्यात देण्यात आले.
ही कौतुकास्पद कामगिरी बार्शी शहर पोलीस ठाण्यातील पोकॉ सचिन राऊत, पोकॉ मोहन कदम व पोकॉ वैभव भांगे यांनी पार पाडली.
पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी नागरिकांना आवाहन केले की, प्रवासादरम्यान आपल्या लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी.
