आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

‘त्या’ तरुणीचा खून पैशाच्या वादातून

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 9, 2026
Spread the love

पुणे : केशवनगर येथील कचरा डेपोच्या रोडलगत एका तरुणीचा गळा दाबून खून करून तिचा मृतदेह टाकून दिल्याचे आढळून आले होते. या तरुणीच्या खुनाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. मुंढवा पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने एका कॅब चालकाला अटक केली आहे.

गोरखनाथ देवराम शिंदे (वय ४२, रा. विडी कामगार वसाहत, चंदननगर) असे या कॅबचालकाचे नाव आहे. आफरीन सलीम पठाण (वय २९, रा. वडगाव शेरी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.

केशवनगर कचरा डेपोजवळील रोडवर बुधवारी रात्री उशिरा एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. तिच्या शवविच्छेदनात गळा दाबल्याने तिचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते.

त्यावरून मुंढवा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. केशवनगर येथे ज्या ठिकाणी तिचा मृतदेह पडला होता, त्या परिसरात सीसीटीव्ही नव्हते.

पोलिसांनी तेथील परिसरातील रोडवरील सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळविले. त्यातून एक कॅब संशयास्पद वाटली. त्यावरून गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने या कॅब चालकाचा शोध घेऊन त्याला पकडले. त्याने गुन्हा कबूल केला.

आफरीन पठाण ही ब्युटी पार्लरचे काम करत होती. या कामासाठी ये-जा करण्यासाठी ती गोरखनाथ शिंदे याच्या कॅबमधून प्रवास करत होती. त्यातून त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले.

अनैतिक संबंधातून ती गर्भवती राहिली होती. तिने गर्भपात करण्यासाठी शिंदे याच्याकडे १ लाख रुपये मागितले होते. त्यामुळे त्यांच्यात वाद होऊ लागला.

तिने त्याच्या घरी सांगण्याची धमकी दिली होती. स्वतःच्या घरी व पत्नीला कळेल, या भीतीपोटी शिंदे याने ५ मे रोजी रात्री पावणे नऊ वाजता आफरीन हिला खराडी बायपास रिलायन्स मॉल येथून गाडीत बसवून खराडी मार्गे आव्हाळवाडी येथे नेले.

तो ५० हजार रुपये घेऊन गेला होता. या कारणावरून त्या ठिकाणी त्यांच्यात वाद झाला. तेव्हा त्याने गळा दाबून तिला मारून टाकले.

तिला गाडीत घालून तो खराडीपासून केशवनगर मार्गे रोडने येताना कचरा डेपोजवळ तिचा मृतदेह टाकून दिला. केशवनगर मार्गे तो मुंढवा चौकातून चंदननगरमधील कामगार वसाहत येथील घरी आला, असे त्याने पोलिसांना सांगितले आहे.

गोरखनाथ शिंदे याने सांगितलेल्या बाबींची पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. मुंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.