आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

तलाठी व कोतवाल यांना ACB ने केली अटक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 9, 2026
Spread the love

पुणे : वडिलोपार्जित जमिनीच्या सातबाऱ्यावर वारसनोंद करण्यासाठी साडेपाच हजार रुपयांची लाच घेताना खेड राजगुरुनगरमधील निमगाव खंडोबा येथील तलाठी व कोतवालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.

ग्राम महसूल अधिकारी/तलाठी मनीषा साहेबराव माने (वय ४५, रा. उमादर्शन सोसायटी, राजगुरुनगर, खेड) आणि कोतवाल दत्तात्रय छबू चव्हाण (वय ५८, रा. खरपुडी बुद्रुक, खेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

तक्रारदार यांचे वडील व इतर नातेवाईक यांच्या नावे खरपुडी बुद्रुक येथे वडिलोपार्जित जिरायत जमीन आहे. तक्रारदार यांच्या वडिलांचे २०२४ मध्ये निधन झाले आहे.

त्यामुळे या जमिनीवर वारसनोंद घेण्यासाठी तक्रारदार यांनी ६ मार्च २०२६ रोजी निमगाव खंडोबा ग्राम महसूल कार्यालयातील अधिकारी मनीषा माने यांच्याकडे अर्ज दिला.

वारंवार चौकशी करूनही तक्रारदार तसेच त्यांचे भाऊ आणि बहिणींची जमिनीवर वारसनोंद करण्यात आली नाही. ३० एप्रिल २०२६ रोजी तक्रारदार वारसनोंदणीबाबत चौकशी करण्यासाठी निमगाव खंडोबा ग्राम महसूल कार्यालयात गेले असता माने यांनी चव्हाण यांना तक्रारदारांकडून वारसनोंद करण्यासाठी पैसे घेण्यास सांगितले.

७ मे रोजी तक्रारदार चव्हाण याला भेटले असता त्याने माने व स्वतःसाठी ६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्याबाबत त्याच दिवशी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

या तक्रारीची ८ मे रोजी पडताळणी करण्यात आली. त्यात मनीषा माने व चव्हाण यांनी तक्रारदारांच्या कामासाठी तडजोडीअंती ५०० रुपयांचा स्टॅम्प व वारसनोंद करण्यासाठी ५ हजार रुपये, अशी एकूण ५ हजार ५०० रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर निमगाव खंडोबा ग्राम महसूल कार्यालयात सापळा रचण्यात आला. मनीषा माने व चव्हाण यांना तक्रारदाराकडून पैसे घेताना पकडण्यात आले.

राजगुरुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता अधिक तपासासाठी न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे तपास करीत आहेत.