आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बनावट कुलमुखत्यार पत्र तयार करून फसवणुकीचा प्रयत्न

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 11, 2026
Spread the love

पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळे व भाजीपाला विभागातील गाळ्यांबाबत बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करून त्याची दुय्यम निबंधक कार्यालयात नोंद करून फसवणूक करण्याचा प्रयत्न समोर आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत क्षितीज खेडकर (वय २७, रा. अंजली अपार्टमेंट, भांडारकर रोड, डेक्कन जिमखाना) यांनी सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

त्यावरून माधव पांडुरंग बोराटे (वय ७३, रा. पिंगळे फार्म हाऊस, कोरेगाव पार्क) आणि रुपेश अशोक समेळ (वय ५२, रा. लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना सातारा रोडवरील धनकवडी येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात ४ सप्टेंबर २०२५ रोजी घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग लक्ष्मण बोराटे, माधव पांडुरंग बोराटे आणि रवींद्र पांडुरंग बोराटे यांच्यात ४ जुलै १९७० रोजी मेसर्स लक्ष्मण नारायण बोराटे या फर्मचे विभाजन झाले होते.

त्यानंतर १ जुलै १९८५ रोजी मेसर्स लक्ष्मण नारायण बोराटे या नावाने पांडुरंग लक्ष्मण बोराटे, माधव पांडुरंग बोराटे आणि रवींद्र पांडुरंग बोराटे यांनी एकत्र येऊन फर्मची पुनर्रचना केली.

ही फर्म १९८८ मध्ये विसर्जित करण्यात आली. पांडुरंग बोराटे यांच्या वारसांनी त्यांच्या इस्टेटीवरील हक्क आई कमलाबाई पांडुरंग बोराटे यांच्या नावावर नोंद करून दिले होते.

कमलाबाई बोराटे यांनी मृत्युपत्राद्वारे सर्व मालकी हक्क थोरला मुलगा रवींद्र बोराटे यांना दिले होते. ते फर्मचे सर्व व्यवहार पाहत होते.

फर्मवरील कर्जदेखील त्यांनीच फेडले होते. २७ डिसेंबर १९९६ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रोप्रायटर रवींद्र पांडुरंग बोराटे यांच्या नावे भाडेपट्टा नोंदविला होता.

रवींद्र बोराटे यांचे १८ नोव्हेंबर २०११ रोजी निधन झाले. त्यानंतर त्यांची सर्व मिळकत पत्नी इंग्रीड रवींद्र बोराटे यांच्या मालकी हक्काने आली.

पांडुरंग बोराटे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने इंग्रीड बोराटे यांच्या बाजूने निर्णय दिला. कृषी उत्पन्न बाजार समितीनेही इंग्रीड बोराटे यांचे एकट्याच्या नावावर वारस नोंद केली.

त्यानंतर २९ जून २०२४ रोजी इंग्रीड बोराटे यांनी फिर्यादी क्षितीज खेडकर आणि हेमंत पिशोरीलाल मलिक यांच्या नावाने मृत्युपत्र तयार केले.

त्यामध्ये गुलटेकडी मार्केटयार्ड येथील फळे व भाजीपाला विभागातील गाळे क्रमांक १८२, १८३, १८४ आणि ८६ ही मिळकत या दोघांच्या नावे करण्यात आली.

या मृत्युपत्राचे न्यायालयाने ७ जानेवारी २०२५ रोजी फिर्यादी आणि मलिक यांना प्रोबेट सर्टिफिकेट दिले. त्यानुसार २४ जानेवारी २०२५ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीने मार्केटयार्डमधील या गाळ्यांबाबत दोघांच्या नावाची नोंद केली.

तेव्हापासून या गाळ्यांचे लाईट बिल, प्रॉपर्टी टॅक्स, बाजार समितीचा सेस, हमाली, तोलाई, लेव्ही आणि इतर देखभाल खर्च फिर्यादी करत आहेत.

त्यानंतर २६ डिसेंबर २०२५ रोजी पणन संचालनालयाने फिर्यादी यांच्या नावाने नोटीस काढली. त्यामध्ये माधव बोराटे आणि त्यांचे कुलमुखत्यारपत्रधारक रुपेश अशोक समेळ यांनी फिर्यादीविरोधात पणन संचालनालयाकडे अर्ज केला होता.

माधव बोराटे यांनी रुपेश समेळ यांना दिलेले बनावट कुलमुखत्यारपत्र फिर्यादींच्या निदर्शनास आले. हे बनावट कुलमुखत्यारपत्र हवेली येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात ४ सप्टेंबर २०२५ रोजी नोंदविण्यात आले होते.

हे कुलमुखत्यारपत्र १३ पानी असून, पणन संचालनालयाकडे त्यापैकी फक्त ६ पाने सादर करण्यात आली होती. त्याद्वारे फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक कल्पना काळे पुढील तपास करीत आहेत.