खंडणी उकळणाऱ्या २ महिलांसह ५ गुंड जेरबंद
मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवसायाचा आरोप : खराडी पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करून २ लाख रुपये खंडणी मागून त्यापैकी ३० हजार रुपये जबरदस्तीने स्पा मालकिणीकडून उकळल्याप्रकरणी खराडी पोलिसांनी ५ जणांना अटक केली. सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने एका आरोपीची ओळख पटवून ही कारवाई करण्यात आली.
प्रतिक जयवंत गायकवाड (वय ३१, रा. कामराजनगर, येरवडा व लांडोबा वस्ती, केसनंद-वाडेगाव रोड, केसनंद), विशाल अशोक साळवे (वय ४०, रा. शंकरराव जाधवनगर, विश्रांतवाडी), रोहित नागनाथ मांढरे (वय ३२, रा. येरवडा), छाया सुखदेव कांबळे (वय ४०, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) आणि सुनिता संजय लोंढे (वय ४३, रा. टेम्पो चौक, वडगाव शेरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
ही घटना खराडी येथील सिटी व्हिस्टा बिल्डिंगमधील फिलटच स्पा येथे १३ मे रोजी सायंकाळी ७ वाजता घडली होती. छाया कांबळे या सामाजिक कार्यकर्त्या असून सुनिता लोंढे या सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.
याबाबत राधिका हरीप्रसाद शर्मा (वय ३८, रा. चौधरी वस्ती, खराडी) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधिका शर्मा यांचे फिलटच स्पा हे मसाज सेंटर सिटी व्हिस्टा बिल्डिंगमध्ये आहे. तेथे १३ मे रोजी सायंकाळी पाच जण आले.
त्यांनी फिर्यादींना या स्पामध्ये वेश्या व्यवसाय चालतो, असे सांगून दमदाटी केली. तसेच तिच्याविरुद्ध पोलीस केस करण्याची धमकी दिली. पोलीस केस न करण्यासाठी फिर्यादींकडे २ लाख रुपयांची खंडणी मागितली.
फिर्यादी यांनी एवढी रक्कम देण्यास नकार दिल्यावर त्यातील महिलांनी फिर्यादी यांच्या डोक्याचे केस धरून ओढले व हाताने कानाजवळ आणि गालावर चापटा मारून मारहाण केली.
शेवटी तडजोडीअंती दीड लाख रुपये देण्याचे ठरले. त्यापैकी ३० हजार रुपये त्यांनी जबरदस्तीने मोबाईलवरून ट्रान्सफर करून घेतले. त्यानंतर फिर्यादी त्यांच्या दुकानामध्ये वेश्या व्यवसाय करू शकतात, त्या कामी ते सर्वजण सपोर्ट करतील, तसेच पोलीस आले तर त्यांना कॉल लावून देतील व पोलिसांचे काही असेल तर ते पाहून घेतील, असेही सांगितले.
उर्वरित ठरलेल्या खंडणीपैकी १ लाख रुपये आणून देण्यासाठी फिर्यादींना कोरेगाव पार्क येथे बोलावले. त्यासाठी त्यातील एका महिलेने तिचा मोबाईल नंबरही दिला होता.
या घटनेनंतर फिर्यादी यांनी खराडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला. तपास पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून पुरुष व महिलांच्या वर्णनाच्या आधारे त्यातील एका पुरुषाचा ठावठिकाणा शोधून काढला.
त्यावरून प्रतिक गायकवाड याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीतून विशाल साळवे आणि रोहित मांढरे यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून केलेल्या चौकशीतून छाया कांबळे आणि सुनिता लोंढे यांना शुक्रवारी, १५ मे रोजी दुपारी अटक करण्यात आली.
आरोपींकडून गुन्ह्यातील ३० हजार रुपये रोख आणि दुचाकी असा ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे पुढील तपास करीत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, पोलीस अंमलदार मनोज खरपुडे, महेश नाणेकर, श्रीकांत शेंडे, साहेबराव गुंडाळे, अशोक केदार, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव आणि विकास केदारी यांनी केली.
