आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गुरुवार पेठेतील भंडारी वाड्यात फटाक्यामुळे आग

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • November 11, 2026
Spread the love

पुणे : गुरुवार पेठेतील पंचहौद येथील भंडारी वाडा येथे फटाक्यामुळे आग लागल्याची घटना घडली. १० नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच जवान घटनास्थळी पोहोचले. जवानांनी पाहिले असता, दुमजली जुन्या व वास्तव्य नसलेल्या वाड्याच्या वरील मजल्यावर आग लागल्याचे निदर्शनास आले. त्याचवेळी तात्काळ स्थानिकांशी संपर्क साधून वाड्यात कोणीही नसल्याची खात्री करण्यात आली आणि पाण्याचा मारा सुरू करण्यात आला.

मात्र, वाडा जुना असल्याने तसेच तो पडण्याच्या स्थितीत असल्याने जवानांनी हा धोका लक्षात घेतला. त्यांनी बाजूच्या वाड्यात प्रवेश करून शिडीच्या साहाय्याने वर जात पाण्याचा मारा केला. आग इतरत्र पसरू न देता सुमारे अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवून धोका दूर केला. यावेळी स्थानिक नागरिकांच्या सांगण्यानुसार, पेटता फटाका वाड्यात पडल्याने ही आग लागली असावी.

या आगीत कोणीही जखमी झालेले नाही. तसेच वाड्यामध्ये कोणीही वास्तव्यास नाही. या घटनेत वाड्याचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या मुख्यालयातील अधिकारी संजय रामटेके, प्रशांत गायकर, एकूण चार वाहने आणि जवळपास वीस जवान तसेच पोलीस, महावितरण, मनपा घरपडी विभाग आणि स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले.