रीवा घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सकल जैन समाजाची भव्य मौन रॅली
“राष्ट्रीय संत सुरक्षा धोरण” लागू करण्यासह निष्पक्ष चौकशीची प्रशासनाकडे मागणी
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : रीवा (मध्य प्रदेश) येथे विहाररत पूज्य आर्यिका माताजी द्वय यांच्या दुर्दैवी निधनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सकल जैन समाजाच्या वतीने भव्य मौन रॅली काढण्यात आली. खऱाडी येथे विराजमान प. पू. मुनिश्री अजीतसागरजी म. सा. यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या रॅलीत समाजातील विविध घटकांनी शांततेत, शिस्तबद्ध पद्धतीने व श्रद्धापूर्वक सहभाग नोंदवत संत सुरक्षा विषयक भावना प्रशासनापर्यंत पोहोचवल्या.
यानंतर माननीय जिल्हाधिकारी, पुणे यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनामध्ये देशभर विहार करणाऱ्या जैन साधू-संत, आर्यिका व साध्वी यांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात यावी, “राष्ट्रीय संत सुरक्षा धोरण” तातडीने लागू करण्यात यावे तसेच रीवा येथील घटनेची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
जैन साधू-संत हे पूर्णतः अहिंसक, अपरिग्रही व पायी विहार करणारे तपस्वी असून ते कोणत्याही प्रकारची वैयक्तिक सुरक्षा अथवा भौतिक साधनांचा वापर करत नाहीत.
त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत संवेदनशील असून शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे समाजाच्या प्रतिनिधींनी नमूद केले.
यावेळी “Sant Security Coordination Cell” स्थापन करणे, विहार मार्गांवर पोलिस गस्त वाढविणे, संवेदनशील भागांमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था करणे तसेच संतांविरुद्ध होणाऱ्या घटनांना विशेष गंभीर श्रेणीत समाविष्ट करणे अशा विविध मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या.
या प्रसंगी सकल जैन समाज पुणेचे अचल जैन, मिलिंद फडे, विलास राठोड, प्रवीण चोरबेले, मनीष जैन, विनय चुडीवाल, अभय जैन, सुमित जैन, शीतल लोहाडे, सुकुमाल जैन, ममता जैन, रीतेश जैन, आनंद कांकरिया, नेमीचंद ठोले, योगेश पांडे, सुरेंद्र गांधी, सुरेंद्र बडजाते, अतुल शाह आदींसह पुण्यातील विविध जैन मंदिरांचे ट्रस्टीगण व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकल जैन समाजाच्या वतीने प्रशासनाने या विषयाची गंभीर दखल घेऊन तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.
