आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

जागा विकसित करून बांधकाम व्यावसायिकाने केली फसवणूक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 25, 2026
Spread the love

पुणे : बावधन बुद्रुक येथील जागा विकसित केल्यानंतर मूळ मालकाकडे करारानुसार आलेल्या फ्लॅटपैकी तीन फ्लॅटची विक्री करून २ कोटी ६४ लाख रुपये मिळाले. मात्र, हे पैसे जागा मालकाला न देता दरमहा २ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून ती रक्कम भांडवल म्हणून गुंतवणूक करण्यात आली. त्यानंतर कोणताही परतावा न देता हातपाय तोडून “कार्यक्रम” करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. कोथरूड पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मनोहर ऊर्फ मनोज अबुराव दगडे (वय ५४, रा. आर. के. ग्रेसिया, अरिहंत कॉलेजजवळ, उत्तमनगर, बावधन) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यावरून पोलिसांनी आर. के. लाईफ स्पेस डेव्हलपर्सचे भागीदार रुपेश हरीभाऊ कुंबरे (वय ४५) आणि कांचन रुपेश कुंबरे (वय ४३, दोघे रा. ऋषिकेश, आझादनगर, कोथरूड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कोथरूडमधील आझादनगर येथे २०११ ते २६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोहर दगडे यांची वडिलोपार्जित जमीन बावधन येथे होती. त्यांच्या वाट्याला असलेली ७८ गुंठे जागा विकसित करण्यासाठी त्यांनी आर. के. लाईफ स्पेस डेव्हलपर्सचे रुपेश कुंबरे यांच्याशी ५० टक्के भागीदारीचा करार केला होता.

त्या जागेवर १२ मजली दोन इमारती उभ्या राहिल्या. फिर्यादींनी त्यांच्या वाटणीला आलेल्या फ्लॅटपैकी एक ४ बीएचके फ्लॅट स्वतःसाठी ठेवला. उर्वरित फ्लॅट अधिक दराने विकून देण्यासाठी कुंबरे यांनी त्यांच्याकडून कुलमुखत्यारपत्र लिहून घेतले.

फिर्यादी यांच्या वाटणीला आलेल्या तीन फ्लॅटची विक्री करून एकूण २ कोटी ६४ लाख रुपये मिळाले. मात्र, ही रक्कम कुंबरे यांनी स्वतःकडेच ठेवली. ही रक्कम त्यांच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा २ टक्के परतावा देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. कुंबरे यांचा व्यवसाय वाढला तर आपले पैसे परत मिळतील, या आशेने फिर्यादींनी त्यांना संमती दिली. मात्र, त्यानंतर या रकमेवर कोणताही परतावा देण्यात आला नाही, तसेच मूळ रक्कमही परत करण्यात आली नाही.

दगडे यांनी पैशांची मागणी केल्यानंतर त्यांना, “तुला कोठे जायचे आहे तेथे जा, आम्ही कोणालाही घाबरत नाही. तुम्हाला खूप माज आला असेल, तर पैसे मागायला आलात तर हातपाय मोडून तुझा कार्यक्रम करतो,” अशी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

तसेच “चिठ्ठीत तुमचे नाव लिहून आत्महत्या करेन,” अशी धमकी देत त्यांची फसवणूक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक आळेकर पुढील तपास करीत आहेत.