दुगड ग्रुप, लेडीज सर्कल इंडिया व राऊंड टेबल इंडियाचा ग्रामीण शिक्षणासाठी पुढाकार
मोनल दुगड यांच्या सहकार्याने पुरंदर व दौंड तालुक्यात शैक्षणिक प्रकल्पांचे लोकार्पण
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि आधुनिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दुगड ग्रुप, लेडीज सर्कल इंडिया (एलसी इंडिया) आणि राऊंड टेबल इंडिया (आरटी इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने पुरंदर आणि दौंड तालुक्यात विविध शैक्षणिक प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले.
‘आशियाना’ या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील पाटीलवस्तीमध्ये अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा नव्या अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. ग्रामीण भागातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी ही अंगणवाडी महत्त्वपूर्ण ठरणार असून, आधुनिक शैक्षणिक साधने व मूलभूत सुविधांनी ती सुसज्ज करण्यात आली आहे.
याचबरोबर दौंड तालुक्यातील दळिंब येथील शाळेमध्ये अत्याधुनिक डिजिटल इंटरॲक्टिव्ह टचस्क्रीन प्रणाली बसविण्यात आली. या सुविधेमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाचा लाभ मिळणार असून डिजिटल शिक्षणाची नवी दारे खुली होणार आहेत.
या दोन्ही प्रकल्पांचे उद्घाटन Poona Cosmopolitan Ladies Circle 81 च्या अध्यक्षा सर्कलर सुमन पोरवाल तसेच Poona Round Table 110 चे अध्यक्ष टेबलर अश्विन संघवी यांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमांना दुगड ग्रुप आणि मोनल दुगड यांचे नेहमीच मोलाचे सहकार्य लाभत आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण, आरोग्य आणि विविध समाजोपयोगी प्रकल्पांसाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले असून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या विकासासाठी राबविण्यात आलेल्या या प्रकल्पांमध्येही त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला.
यावेळी सुमन पोरवाल आणि अश्विन संघवी यांनी सांगितले की, “लेडीज सर्कल इंडिया आणि राऊंड टेबल इंडिया या संस्था ‘झिरो ओव्हरहेड’ तत्त्वावर कार्य करतात. जनतेकडून प्राप्त होणारी प्रत्येक देणगी थेट समाजोपयोगी प्रकल्पांवर खर्च केली जाते. तसेच देणगीदारांकडून मिळालेल्या योगदानाइतकीच रक्कम संस्थांकडूनही उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे अशा प्रकल्पांचा प्रभाव अधिक व्यापक आणि परिणामकारक ठरतो.”
ग्रामीण शिक्षणाच्या उन्नतीसाठी तसेच विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात आलेले हे उपक्रम भविष्यातील सक्षम पिढी घडविण्यासाठी प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरतील, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
