आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 16, 2026
Spread the love

पुणे : पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाल्यानंतर दोन मुले असलेल्या महिलेशी एका तरुणाने विवाह केला. मात्र, त्याच्या पत्नी व मुलांचे लक्ष केवळ पैशांवर होते. ते जादूटोणा करून त्याला मानसिक त्रास देत असल्याच्या कारणावरून त्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

राजीव मनोहर पायगुडे (वय ५३, रा. शुक्रवार पेठ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांचे भाऊ रवींद्र मनोहर पायगुडे (वय ५५, रा. बिबवेवाडी) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून मनिषा ऊर्फ मंगल राजीव पायगुडे (वय ४०), स्मृती राजीव पायगुडे (वय २४) आणि रोहित राजीव पायगुडे (वय २२, सर्व रा. मांडवी, ता. हवेली) यांना अटक केली आहे. ही घटना शुक्रवार पेठ येथील घरात १५ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्यापूर्वी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीव पायगुडे यांचा कौटुंबिक कारणांमुळे १९९९-२००० मध्ये घटस्फोट झाला होता. त्यानंतर २०२० मध्ये त्यांनी मनिषा ऊर्फ मंगल हिच्याशी दुसरे लग्न केले. मनिषा हिला पहिल्या पतीपासून स्मृती व रोहित अशी दोन मुले आहेत.

राजीव हे त्यांच्यासोबत हवेली तालुक्यातील मांडवी येथे राहत होते. ते तहसीलदार कार्यालयात काम करत असल्याने शुक्रवार पेठेतील वडिलोपार्जित घरीही राहत असत. दिवसभर कामानिमित्त पुण्यात राहून रात्री मांडवी येथे जात असत. राजीव यांनी २० एप्रिल २०२६ रोजी फिर्यादी रवींद्र पायगुडे यांना फोन करून सांगितले होते की, पत्नी मनिषा, मुलगी स्मृती आणि मुलगा रोहित यांनी त्यांना कोयत्याने मारहाण केली असून ते सतत त्रास देतात. त्यांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, “मी दोन दिवसांत तुम्हाला दिसणार नाही,” असेही म्हटले होते.

रवींद्र पायगुडे यांनी त्यांना समजावून सांगितले आणि काही दिवस आईकडे राहण्याचा सल्ला दिला. त्यानुसार राजीव काही दिवस बिबवेवाडी येथे आई व बहिणीसोबत राहत होते.

त्यानंतर १५ जून रोजी शुक्रवार पेठेतील घरी राजीव यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांनी मृत्यूपूर्वी खडक पोलिसांच्या नावे सुसाइड नोट लिहून ठेवली होती. त्या सुसाइड नोटमध्ये त्यांनी नमूद केले होते की, “माझी पत्नी मंगल, मुलगी स्मृती आणि मुलगा रोहित यांना फक्त पैसे हवे आहेत, माणुसकी नाही.

२० एप्रिल रोजी मारहाण झाल्यानंतर मी मांडवी येथील घरी गेलो नाही. मी त्यांना लहानाचे मोठे केले, मात्र त्यांनी त्या उपकारांची जाण ठेवली नाही. त्यामुळे मला आता जगायचे नाही.

मंगल हिने माझ्या आई-वडिलांचे नाव खराब केले आहे. मनिषा जादूटोणा करत आहे. मंगल, स्मृती आणि रोहित यांच्या मानसिक त्रासाला व जाचाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे.” या प्रकरणी खडक पोलिसांनी तिघांना मांडवी येथील घरातून ताब्यात घेऊन अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक जयसिंग दाढे पुढील तपास करीत आहेत.