गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची ९५ लाखांची फसवणूक
व्हॉट्सॲप ग्रुपवरून नफ्याचे आमिष : रोख रकमेची करत होते मागणी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची ९५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी अक्षय दिलीप ननावरे (वय २७, रा. ससाणेनगर, हडपसर), दीपक सुधाकर चौधरी (वय ३३, रा. सिद्धीविनायक अक्षर विहार सोसायटी, एनडीए रस्ता, उत्तमनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत एका व्यावसायिकाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक तरुण हडपसर भागात राहतो.
आरोपींशी त्यांची ओळख झाली होती. ते हॉटेलमध्ये एकत्र भेटत असत. त्यावेळी त्यांनी फिर्यादीला आम्ही एक व्हॉट्सॲप ग्रुप केला असून, लोकांकडून पैसे घेऊन शेअर बाजारात गुंतवणूक करतो.
त्यात चांगला परतावा देतो, असे सांगितले. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास दरमहा पाच ते दहा टक्के परतावा देण्याचे आमिष आरोपींनी त्यांना दाखविले होते.
त्यानंतर आरोपींनी व्यावसायिकाकडून १ कोटी ५ लाख रुपये रोख स्वरूपात घेतले. तसेच ऑनलाइन पद्धतीने तरुणाकडून १९ लाख रुपये घेतले.
आरोपींनी तरुणाला २५ लाख रुपये नफा मिळाल्याचे सांगून ती रक्कम दिली. त्यानंतर परतावा न दिल्याने तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. आरोपींनी ९५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
त्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधील आणखी लोकांचीही फसवणूक झाली असल्याची शक्यता आहे. पोलीस उपनिरीक्षक पंकज खोपडे तपास करत आहेत.
