आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

नवी खडकीत धक्का लागल्याने दोन गटात हाणामारी

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 16, 2026
Spread the love

पुणे : धक्का लागल्याच्या कारणावरून डायमंड चौकात दोन गटांत हाणामारी झाली. त्यात तलवार व फायटरचा वापर करून एकमेकांना मारहाण करण्यात आली. लक्ष्मीनगर पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे.

शिवम राजू ढेंबरे (वय २२, रा. चंद्रमानगर, प्रतिकनगर, येरवडा), शुभम वशिष्ठ तिवारी (वय २२, रा. मित्तल सोसायटी, प्रतिकनगर, येरवडा), सोहेल समीर खान (वय २२, रा. डायमंड चौक, भोसले वस्ती, येरवडा), शुभम शाम पोळ (वय २५, रा. डायमंड चौक, भोसले वस्ती, येरवडा), साहिल समीर खान (वय २५, रा. डायमंड चौक, भोसले वस्ती, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

राजू राहुल जाधव, ऋषिकेश देवदास जाधव, लखन कांबळे (तिघे रा. भोसले वस्ती, येरवडा), शाहरुख शेख (रा. यशवंत नगर, येरवडा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस हवालदार किरण शंकर भागीत (वय ३८) यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार नवी खडकीतील डायमंड चौक येथील नवज्योत मित्र मंडळाजवळ १४ सप्टेंबर रोजी रात्री पावणे आठ वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक निखिल पवार, दत्तात्रय लिगाडे व त्यांचे सहकारी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी ते डायमंड चौकाच्या अलीकडे पायी चालत जात होते. डायमंड चौकात गर्दी झाली होती.

आरडाओरडा व गोंधळ सुरू होता. ते पाहून पोलीस धावतच तेथे पोहोचले. काही मुले आपसात मारामारी करताना दिसली. त्यातील एका मुलाच्या हातात तलवारीसारखे हत्यार दिसून आले. पोलिसांना पाहून ते पळून जाऊ लागले. पोलिसांनी त्यातील ५ जणांना पकडले.

शुभम पोळ याने सांगितले की, मंडळाचे डेकोरेशनचे काम करण्यासाठी डायमंड चौक येथे रस्त्यावर थांबलो होतो. राजू राहुल जाधव याने पायी चालत जाताना शुभम यास धक्का दिला. त्यामुळे शुभमनेदेखील त्यास धक्का दिला.

त्यावर राज जाधव याने फोन करून ४ ते ५ मुलांना बोलावून घेतले. ती मुले शुभम पोळला मारहाण करत असताना त्याला वाचविण्यासाठी त्याचे मित्र सोहेल खान, साहिल खान आले होते.

राज जाधव याने बोलावलेल्या ऋषिकेश जाधव याने हातातील फायटरने सोहेल खान याच्या गळ्यावर व पोटावर मारले. लखन कांबळे याने हाताने मारहाण केली.

त्याला वाचविण्यासाठी समीरने तलवार काढली होती, असे सांगितले. पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, दोन्ही गटांतील ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा तपास सहायक पोलीस निरीक्षक निखिल पवार करीत आहेत.