भन्साळी यांच्या निवासस्थानी भक्तीचा जागर
महाआरती व माता की चौकी उत्साहात
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : प्रसिद्ध उद्योगपती अनिल भन्साळी यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणपती बाप्पाच्या महाआरती व माता की चौकीचे भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. धार्मिक श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकोप्याचा सुंदर संगम या कार्यक्रमात पाहायला मिळाला.
कार्यक्रमाला राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्यासह विविध राजकीय पक्षांतील नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि महाआरतीत सहभाग नोंदविला.
सामाजिक क्षेत्रातूनही कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुणे सकल जैन समाजाचे अध्यक्ष विजयकांत कोठारी यांच्यासह विविध सामाजिक, धार्मिक व सेवाभावी संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी, उद्योजक आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी उपस्थित राहून भन्साळी परिवाराच्या या धार्मिक उपक्रमाचे कौतुक केले.
माता की चौकीच्या निमित्ताने सादर करण्यात आलेल्या भक्तिगीतांनी आणि देवीच्या भजनांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. भाविकांनी उत्स्फूर्तपणे भजनांमध्ये सहभाग घेतला. श्री गणपती बाप्पाची महाआरती झाल्यानंतर सर्वांच्या सुख-समृद्धी, आरोग्य आणि समाजकल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन अनिल भन्साळी, एकता भन्साळी आणि अल्पेश भन्साळी यांनी केले. भन्साळी परिवाराच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवर, पाहुणे आणि भाविकांचे स्वागत करण्यात आले.
दरवर्षी आयोजित होणाऱ्या या धार्मिक सोहळ्यामुळे सामाजिक संबंध अधिक दृढ होत असून, विविध क्षेत्रांतील मान्यवर एकाच व्यासपीठावर एकत्र येत असल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
