हिंदी काव्यातून राष्ट्रचेतना आणि सांस्कृतिक अस्मितेचा जागर
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : विद्या विकास मंडळ, पाथरूड संचलित शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथील हिंदी विभाग आणि आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या संयुक्त विद्यमाने हिंदी पखवाडा व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ‘हिंदी की राष्ट्रीय-सांस्कृतिक काव्यधारा’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनुराधा जगदाळे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून राजस्थान केंद्रीय विश्वविद्यालय, बांदरसिंदरी, किशनगढ, अजमेर (राजस्थान) येथील हिंदी विभागाचे सहायक आचार्य डॉ. गजानन हरिभाऊ सर्वज्ञ उपस्थित होते. प्रमुख उपस्थितींमध्ये प्राचार्य डॉ. संतोष शिंदे, समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. तानाजी बोराडे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. गोकुळ सुरवसे आणि डॉ. शामसुंदर आगे यांचा समावेश होता.
मार्गदर्शन करताना डॉ. गजानन सर्वज्ञ यांनी हिंदी साहित्याच्या राष्ट्रीय-सांस्कृतिक काव्यधारेचा सविस्तर आढावा घेतला. हिंदी काव्यपरंपरेने भारतीय समाजात राष्ट्रभावना, सांस्कृतिक अस्मिता, सामाजिक जागृती आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विविध कवींच्या साहित्यकृतींच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, स्वातंत्र्यचळवळ आणि राष्ट्रचेतना यांचे प्रभावी चित्रण झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजश्री तावरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. ज्योती डुंगरवाल यांनी केले, तर आभार डॉ. संतोष भांडवलकर यांनी मानले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. नितीन पडवळ, डॉ. अशोक दुनघव, डॉ. जगदाळे, डॉ. मंगेश खराटे, प्रा. राहुल राठोड, प्रा. अंधारे, प्रा. काळे, डॉ. अलगुंडे, प्रा. गिरी तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि हिंदीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
