पांढर्या पट्ट्यांच्या वादाला राजकीय रंग देऊ नये
महाराष्ट्राला बदनाम करण्याचे हे षडयंत्र – ललित गांधी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
मुंबई : जैन समाजाच्या धार्मिक स्थळांवर अथवा सोसायट्यांमध्ये काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून निर्माण झालेला वाद निरर्थक आणि अनाठायी असून, शांतताप्रिय व अहिंसावादी जैन समाजाला लक्ष्य करून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याची शंका अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राला उच्च सांस्कृतिक मूल्यांची हजारो वर्षांची परंपरा लाभली आहे. जैन समाज हा महाराष्ट्राचा हजारो वर्षांपासून अविभाज्य घटक राहिला असून, त्याला जाणीवपूर्वक बदनाम करून महाराष्ट्राची सांस्कृतिक वीण विस्कळीत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप गांधी यांनी केला.
धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण करून वेगाने विकसित होत असलेल्या महाराष्ट्र व मुंबईच्या प्रगतीला खीळ घालण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
पांढऱ्या रंगाचे पट्टे काढण्यामागे कोणत्याही प्रकारचे धार्मिक वर्चस्व किंवा भेदभाव नसून, करुणा, जीवदया आणि मानवतेच्या भावनेतून भक्तीच्या उद्देशाने ही व्यवस्था केली जाते, असे गांधी यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, जैन साधू-साध्वी हे कायम अनवाणी विहार करतात. ते कोणत्याही प्रकारचे वाहन अथवा अन्य सुविधा वापरत नाहीत. दरवर्षी वाढणाऱ्या तापमानामुळे उन्हाची तीव्रता वाढत असून, अशा परिस्थितीत जैन साधू-साध्वी भिक्षेसाठी अनवाणी घरोघरी जातात.
त्यावेळी त्यांचा त्रास काही प्रमाणात कमी व्हावा, हा या व्यवस्थेचा उद्देश असतो. तसेच पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर जीव-जंतू आणि बुरशी निर्माण होत असल्याने जीवदयेच्या तत्त्वांचे पालन करण्यासाठीही ही व्यवस्था उपयुक्त ठरते.
अशा प्रकारचे पांढरे पट्टे विविध धर्मांच्या मंदिरांमध्ये तसेच काही सार्वजनिक ठिकाणीही आढळतात. त्यामुळे मुद्दाम जैन समाजाला लक्ष्य करून बदनामीची मोहीम राबविणे हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला शोभणारे नसल्याचे गांधी यांनी नमूद केले.
भविष्यात अशा प्रकारचे वाद पुन्हा उद्भवू नयेत यासाठी जैन समाजाने संबंधित प्रशासनाची आवश्यक परवानगी घेऊनच अशा प्रकारच्या व्यवस्था कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
जैन समाज हा नेहमीच सौहार्दपूर्ण पद्धतीने राहणारा समाज असून, या विषयाबाबत गैरसमज न करता सर्वांनी सामोपचाराने मार्ग काढावा, असे आवाहन त्यांनी केले.
यासंदर्भात जैन समाजातील प्रमुखांची बैठक लवकरच मुंबई येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही ललित गांधी यांनी दिली.
