आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गोखलेनगरमध्ये मित्राला मारहाण करून खून

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 19, 2026
Spread the love

पुणे : मैत्रिणीवरून झालेल्या भांडणाच्या कारणावरून तरुणाला बेसबॉलच्या स्टिकने कानावर मारहाण करून त्याचा खून करणाऱ्या तिघांना चतु:श्रृंगी पोलिसांनी नवी मुंबईतील रबाळे येथून अटक केली आहे.

हर्षद मच्छिंद्र जाधव (वय २०, रा. गोखलेनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याची आई पौर्णिमा जाधव (वय ४०) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अभिषेक संतोष पवार (वय २०), प्रथमेश बाबू धोत्रे (वय २१) आणि मारुती बाबू देवकर (वय २८, सर्व रा. पीएमसी कॉलनी, जनवाडी) यांना अटक केली आहे. ही घटना गोखलेनगरमध्ये पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षद जाधव याच्यावर कोरेगाव पार्क, येरवडा आणि आळंदी पोलीस ठाण्यांत आर्म ॲक्ट व मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. हर्षद आणि अभिषेक पवार हे जवळचे मित्र होते. त्यांची एक मैत्रीण आहे. या मैत्रिणीवरून त्यांच्यात १२ जून रोजी भांडण झाले होते. त्यावेळी हर्षद याने त्यांना मारहाण केली होती.

हर्षद जाधव हा रात्री उशिरापर्यंत रिक्षामध्ये बसून मोबाईलवर गेम खेळत असे. अनेकदा त्याचे मित्रही त्याच्यासोबत असत. त्यामुळे हर्षदची माहिती आरोपींना होती. नेहमीप्रमाणे हर्षद हा रिक्षामध्ये बसला होता.

पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास पाच जण तेथे आले. त्यांनी रिक्षात बसलेल्या हर्षदला बाहेर ओढून त्याला दांडके आणि बेसबॉलच्या स्टिकने मारहाण केली. त्यातील एक फटका त्याच्या कानावर जोरात बसला. त्यामुळे त्याच्या कानातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊ लागला. ते पाहून हल्लेखोर पळून गेले.

हर्षद याचा आरडाओरडा ऐकून लोक जमा झाले. त्यांनी त्याला रुग्णालयात नेले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

लोकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि तांत्रिक तपासातून आरोपी नवी मुंबईतील रबाळे येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक शीतल जाधव करीत आहेत.