आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बोगस खेळाडू प्रमाणपत्र प्रकरणात कोल्हापूरच्या दाम्पत्याला अटक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 16, 2026
Spread the love

पुणे : पुणे शहर पोलिस दलाच्या शिपाई भरती प्रक्रियेत कुराश या खेळाची बनावट प्रमाणपत्रे तयार करून खेळाडू आरक्षणाचा गैरफायदा घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या रॅकेटची व्याप्ती राज्यभर असल्याचे समोर आले होते. दरम्यान, आता या प्रकरणात कोल्हापूरच्या पुनगावकर दाम्पत्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी कोल्हापूरातून अटक केली.

ऋतुजा पुनगावकर (वय ४५) आणि धैर्यशील पुनगावकर (वय ५१, दोघे रा. कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याची नावे आहेत.

याप्रकरणी गेल्या आठवड्यात महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश नागर आणि सचिव शिवाजी साळुंखे या दोघांना अटक करण्यात आली आहे.

आत्तापर्यंत या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली असून, इतर काही जणांकडे अद्याप चौकशी सुरू असल्याचे गुन्हे शाखेच्या अपर पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.

कुराश असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या अकरा वर्षांत तब्बल एक हजारांहून अधिक प्रमाणपत्रे राज्यात वाटली आहेत. या प्रमाणपत्रांच्या आधारे शासनाच्या विविध विभागांत किती जणांनी नोकऱ्या मिळवल्या, याची पडताळणी पोलिस करत आहेत.

त्यामुळे केवळ पुणे पोलिस दलातील १९ जणांपुरतेच हे प्रकरण मर्यादित नसून, राज्यातील विविध शासकीय भरती प्रक्रियांपर्यंत या रॅकेटचे धागेदोरे पोहोचल्याचा अंदाज आहे.

कोल्हापूरातून पुनगावकर दाम्पत्याला अटक करण्यात आल्यामुळे या रॅकेटचे धागेदोरे कोल्हापूरपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. याबाबत बोलताना सातपुते यांनी सांगितले की, हे दाम्पत्य आरोपी सचिव शिवाजी साळुंखे याचे नातेवाईक आहेत.

पुनगावकर हे कोल्हापूरात क्रीडा ॲकॅडमी चालवतात. आरोपींनी कुराश खेळाच्या प्रमाणपत्रांच्या अनुषंगाने जी बनावट कागदपत्रे तयार केली, ती सर्व कागदपत्रे याच पुनगावकर दाम्पत्याच्या ॲकॅडमीत तयार करण्यात आली आहेत.

तसेच, साळुंखे याला अटक करण्यात आली तेव्हा त्यांनी ही बनावट कागदपत्रे लपवून ठेवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. साळुंखे आणि नागर यांच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत पुनगावकर दाम्पत्याचे नाव समोर आले होते. पोलिसांनी या दोघांना गुरुवारी कोल्हापूरातून ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे कसून चौकशी केली. त्यानुसार पोलिसांना दोघांचा या गुन्ह्यातील सहभाग निदर्शनास आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

आरोपींनी कुराश या खेळात प्रत्यक्ष सहभागी न झालेल्या व्यक्तींना खेळाडू असल्याचे दाखवून प्रमाणपत्रे दिली. या प्रमाणपत्रांचा वापर राज्य सरकारच्या विविध विभागांमधील भरती प्रक्रियेत करण्यात आला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

शासनाच्या विविध विभागांतील भरतीमध्ये खेळाडूंसाठी पाच टक्के आरक्षण आहे. याच आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी बनावट प्रमाणपत्रांचा वापर झाला का, याचा तपास पोलिस करत आहेत.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुणे शहर पोलिस दलातील भरतीमध्ये अशा प्रमाणपत्रांच्या आधारे १९ उमेदवारांनी खेळाडू आरक्षणाचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे.

त्यापैकी दहा जण प्रशिक्षणासाठी गेले आहेत, तर अन्य नऊ जणांचे प्रशिक्षण अद्याप सुरू झालेले नव्हते. भरती प्रक्रियेदरम्यान या उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची क्रीडा विभागाकडून पडताळणी करण्यात आली होती आणि त्यांना मान्यताही देण्यात आली होती. त्यामुळे प्रमाणपत्रांची पडताळणी नेमक्या कोणत्या आधारावर करण्यात आली, याचाही तपास केला जाणार आहे.