आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

योगातून निरोगी जीवनाचा संदेश; साधना कन्या प्रशालेत योग दिन साजरा

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 20, 2026
Spread the love

बार्शी : जागतिक योग दिनानिमित्त शेठ मुळचंद व जवारमल साधना कन्या प्रशाला, बार्शी येथे “आरोग्याची चतुःसूत्री – सकारात्मक विचार, पुरेशी विश्रांती, योग्य आहार आणि योग-प्राणायाम” या विषयावर विशेष मार्गदर्शन व योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास सुमारे 200 विद्यार्थिनींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक पोपट दत्तात्रय कानगुडे (सेवानिवृत्त शिक्षक व हॅपी क्लब बार्शीचे सदस्य) यांनी विद्यार्थिनींना योगाचे शारीरिक, मानसिक व सामाजिक जीवनातील महत्त्व पटवून दिले.

योग ही भारताची जगाला मिळालेली अमूल्य देणगी असून निरोगी शरीर, शांत मन आणि संतुलित जीवनासाठी नियमित योगाभ्यास आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

आजच्या धकाधकीच्या जीवनात वाढता ताण, असंतुलित आहार व बदलती जीवनशैली यामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होत आहेत. अ

शा परिस्थितीत सकारात्मक विचार, संतुलित आहार, पुरेशी विश्रांती आणि नियमित योग-प्राणायाम हीच आरोग्याची खरी चतुःसूत्री असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी विविध योगासने व प्राणायामांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून विद्यार्थिनींकडून सराव करून घेतला. प्रसंगी प्रशालयाचे मुख्याध्यापिका विनिता काळे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थीदशेत चांगल्या सवयी अंगीकारणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

नियमित योग व व्यायामामुळे शरीर सुदृढ राहतेच, शिवाय एकाग्रता, स्मरणशक्ती, आत्मविश्वास आणि आकलनशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे समजतो, लक्षात राहतो आणि परीक्षेतील तणाव कमी होतो.

मोबाईल व सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांनी दररोज काही वेळ योग, व्यायाम आणि मैदानी खेळांसाठी राखून ठेवावा. निरोगी विद्यार्थी हेच उद्याचे सक्षम व जबाबदार नागरिक बनतात, असे प्रतिपादन त्यांनी केले.

कार्यक्रमास मुख्याध्यापिका विनिता काळे, शिक्षिका जयश्री गाढवे, शिक्षिका एम. पी. पाटील, व्ही. नांदवटे, कनिष्ठ लिपिक विनायक माने, शिक्षक दीपक दुधनकर, विभीषण नलगे, नागनाथ सावंत आणि गणेश सावंत यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थिनींमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण झाली असून निरोगी, तणावमुक्त व संतुलित जीवन जगण्यासाठी नियमित योगाभ्यास करण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थिनींनी दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याचा संकल्प केला.