बिष्णोई टोळीकडून मंतरवाडी येथील दुकानावर गोळीबार
खंडणीसाठी फोन केल्यावर खिल्ली उडविल्याने केला गोळीबार : सोशल मीडियावर पोस्ट करून स्वीकारली जबाबदारी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मंतरवाडी येथील एका बंद दुकानावर सोमवारी रात्री एका हल्लेखोराने चार गोळ्या झाडल्या. खंडणीसाठी फोन केला असताना आमची खिल्ली उडविल्याने हा गोळीबार केला. पुढच्या वेळी थेट छातीवर गोळ्या झाडल्या जातील, अशी धमकी त्यांनी सोशल मीडियावर दिली आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गौहर हसन यांनी सांगितले की, अमोल चमादाई यांचे मंतरवाडी येथे एच. विकास अँड स्टील प्रा. लि. हे दुकान आहे.
त्यांना सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास अर्जुन बिष्णोई असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने फोन केला होता. त्याने खंडणीची मागणी केली.
त्यानंतर त्यांनी दुकान बंद करून तक्रार देण्यासाठी वानवडी पोलीस ठाण्यात सायंकाळी सात वाजता धाव घेतली. तेथून त्यांना फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी पाठविण्यात आले.
ते फिर्याद देत असताना रात्री ८ वाजून १० मिनिटांनी एका हल्लेखोराने त्यांच्या दुकानावर एकापाठोपाठ चार गोळ्या झाडल्या. हल्लेखोराने हुडी घालून आपला चेहरा झाकला होता. याबाबत अमोल राजेंद्र चमादाई यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या गोळीबाराची जबाबदारी बिष्णोई टोळीतील आरजू बिष्णोई आणि शुभम लोणकर यांनी स्वीकारली आहे. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये, “आम्ही कॉल केला असता त्याने आमची खिल्ली उडवली.
पुढच्या वेळी गोळी डोक्यात मारून मामला संपवून टाकू,” अशी धमकी दिली आहे. “आमच्या कॉलकडे दुर्लक्ष करू नका. पुढच्या वेळी गोळी भिंतीवर नाही, तर छातीवर चालेल,” असेही त्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
बिष्णोई टोळीचे पुणे कनेक्शन यापूर्वीही अनेकदा समोर आले आहे. शुभम लोणकर हा पुण्यात बिष्णोई टोळीचे काम पाहत असल्याचे सांगितले जाते.
तसेच पंजाबमधील एका गायकाच्या हत्येप्रकरणी राजगुरुनगर येथील गुंडांना ग्रामीण पोलिसांनी पकडून पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
रोहित शेट्टी आणि सलमान खान यांनाही बिष्णोई टोळीने धमकावले होते. आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातील वारजे परिसरातील तरुणांचा वापर शुभम लोणकर याने केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात मुंबई पोलिसांनी अनेकांना अटक केली आहे. प्रसिद्ध व्यक्तींना धमक्या देऊन आणि त्यासाठी तरुणांचा वापर करून बिष्णोई टोळी प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करते. त्यातून व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी उकळण्याचे त्यांचे प्रयत्न असतात.
