आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कौटुंबिक वादातून महिलेचा खून

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 24, 2026
Spread the love

पुणे : कौटुंबिक वादातून महिलेच्या गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना खराडी भागात बुधवारी घडली. या प्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पती फरार झाला आहे.

किरण दयाराम बाबर (वय ३२, रा. भनगाई वस्ती, खराडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती दयाराम तोताराम बाबर (वय ३६) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत किरण हिचा भाऊ दादू सजन बोरसे (वय २३, रा. भनगाई वस्ती, खराडी) याने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दयाराम बाबर हा खासगी ठिकाणी सफाई कामगार म्हणून काम करतो.

त्याची पत्नी किरण ही खराडी परिसरात घरकामे करते. बाबर दाम्पत्याला एक मुलगा व एक मुलगी आहे. आरोपीला दारू पिण्याचे व्यसन आहे. गेल्या काही दिवसांपासून बाबर दाम्पत्यात वाद होत होते.

बुधवारी (२४ जून) पहाटे चारच्या सुमारास किरण गाढ झोपेत असताना शेजारीच मुले झोपलेली होती. त्यावेळी आरोपीने तिच्या गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले.

तसेच किरणचे नाक व कानही तीक्ष्ण शस्त्राने कापले. गंभीर जखमी झालेल्या किरणला तिचा भाऊ दादू याने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

आरोपी पती फरार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. कौटुंबिक वादातून आरोपीने पत्नीचा खून केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.

खून करण्यासाठी वापरण्यात आलेले शस्त्र अद्याप मिळालेले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक सचिन जाधव या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.