नसरापूर बालिका हत्याकांड प्रकरणी नराधम दोषी
फाशीच्या शिक्षेची मागणी : सोमवारी, २९ जून रोजी शिक्षा सुनावणार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर बालिका हत्याकांडातील नराधमाला पुणे जिल्हा सत्र न्यायालयातील विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी दोषी ठरविले आहे. त्याच्या शिक्षेबाबत आज युक्तिवाद झाला असून, सोमवारी, २९ जून रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) असे या नराधमाचे नाव आहे. सरकार पक्षाने या आव्हानात्मक खटल्यात सर्व साक्षीपुरावे तसेच सर्व तांत्रिक पुरावे सादर करून आरोपीने यापूर्वीही असेच दोन गुन्हे केले होते, मात्र तांत्रिक कारणांमुळे तो निर्दोष सुटला होता, हे न्यायालयासमोर सिद्ध केले. त्यामुळे तो कोणत्याही दयेला पात्र नसून हा ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ खटला मानून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अजय मिसार यांनी केला.
नसरापूर बालिका हत्याकांडामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. लोकभावना लक्षात घेऊन शासनाने या प्रकरणात अजय मिसार यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली. हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात आला. १ मे रोजी घडलेल्या या घटनेच्या अवघ्या दोन महिन्यांत निकाल लागला आहे.
विशेष सरकारी वकील अजय मिसार यांनी सांगितले की, इतक्या कमी कालावधीत अवघ्या १६ दिवसांत ५५ साक्षी पूर्ण करून खटल्याचा निकाल लागण्याची ही माझ्या पाहण्यात आलेली पहिलीच घटना आहे.
हा संपूर्ण खटला परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित होता. आरोपीने अतिशय थंड डोक्याने कट रचून अत्यंत निर्घृणपणे हे नीच कृत्य केले. पीडित मुलीवर दुपारी ३ वाजून १२ मिनिटांपासून ते ३ वाजून ५२ मिनिटांपर्यंत, म्हणजे तब्बल ३९ मिनिटे अत्याचार करण्यात आला. तिच्या शरीरावर एकूण १८ जखमा होत्या.
त्याने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला इतकेच नव्हे, तर तिच्या मृत्यूनंतरही तिच्या मृतदेहाशी लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे ही ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ केस असल्याचे आम्ही न्यायालयात प्रतिपादन केले.
आज न्यायालयात भीमराव कांबळे याला हजर करण्यात आल्यानंतर न्यायाधीश साळुंखे यांनी, “तुला काही सांगायचे आहे का?” असा प्रश्न विचारला. त्यावर आरोपीने काहीही उत्तर दिले नाही. त्यानंतर न्यायालयाने त्याला दोषी ठरविले. त्यानंतर आरोपीला कोणती शिक्षा द्यावी, यावर युक्तिवाद झाला.
आरोपीने अतिशय थंड डोक्याने हे नीच कृत्य केले. तो २५ तारखेला तेथे राहण्यासाठी आला होता. मुलगी आणि तिची आजी या दोघीच त्या ठिकाणी राहतात, याची त्याने आधीच रेकी केली होती.
घटनेच्या दिवशी त्याने तेथे खेळत असलेल्या मुलांना दगड मारून हाकलून दिले. त्यावेळी मुलांनीही त्याच्यावर दगडफेक केली होती. ही केस ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ असल्याचे प्रतिपादन करताना १२ न्यायनिर्णयांचे (Case Laws) संदर्भ न्यायालयासमोर देण्यात आले, असे विशेष सरकारी वकील अजय मिसार यांनी सांगितले. आता सोमवारी न्यायालय कोणती शिक्षा सुनावते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खटल्यातील महत्त्वाच्या बाबी :
१,२०० पानांचे दोषारोपपत्र
खटल्यात अवघ्या १६ दिवसांत ५५ साक्षी नोंदविण्यात आल्या
६ सीसीटीव्ही फुटेज आणि ती अस्सल असल्याची सायबर तज्ज्ञांची साक्ष
न्यायालयात सकाळी ११ ते सायंकाळी ६ अशी सलग सुनावणी
अवघ्या दोन महिन्यांच्या आत खटल्याचा निकाल
