खंडणी उकळणाऱ्या भीम संघर्ष संघटनेच्या तिघांना अटक
महापालिकेकडे तक्रार करून बांधकाम पाडले; १० लाखांच्या खंडणीची मागणी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : एचआयव्ही बाधित मुलांसाठी कार्य करणाऱ्या ममता फाऊंडेशनने मांगडेवाडी येथे मुलांच्या निवासासाठी बांधकाम सुरू केले होते. या बांधकामाविरोधात महापालिकेकडे तक्रार करून अतिक्रमण कारवाई घडवून आणली. त्यानंतर उर्वरित बांधकाम पाडू नये, यासाठी १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी भीम संघर्ष संघटनेच्या संस्थापक अध्यक्षासह तिघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली.
विनोद निवृत्त गायकवाड (वय ५३, रा. विंझर, ता. वेल्हा), संग्राम दत्तात्रय सोनवणे (वय ३०, रा. विंझर, ता. वेल्हा) आणि सुधीर मुगुट शेडगे (वय ३८, रा. हुजूरपागा शाळेसमोर, मांगडेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर आरपीआय (खरात गट) पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कांबळे आणि निलेश कुंभार यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची ममता फाऊंडेशन ही संस्था एचआयव्ही बाधित गरीब मुला-मुलींसाठी कार्य करते. संस्थेतील मुलांच्या निवासासाठी मांगडेवाडी येथे एक इमारत व दोन घरे बांधण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, या बांधकामाबाबत महापालिकेकडून बांधकाम थांबविण्याची नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी काम थांबविले होते. मात्र, २१ मे रोजी महापालिकेने अनधिकृत बांधकाम असल्याचे सांगून संबंधित बांधकामाचा काही भाग पाडला. परिसरात इतर अनेक बांधकामे सुरू असतानाही केवळ त्यांच्या बांधकामावरच कारवाई करण्यात आल्याने त्यांनी यामागील कारणाचा शोध घेतला. त्यावेळी भीम संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद गायकवाड यांनी महापालिकेकडे तक्रार दिल्यानंतर ही कारवाई झाल्याची माहिती त्यांना मिळाली.
याबाबत माहिती घेण्यासाठी फिर्यादी यांनी ४ जून रोजी आरपीआय (खरात गट) पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कांबळे यांची भेट घेतली. त्यावेळी “विनोद गायकवाड हा आमचाच कार्यकर्ता असून, त्याला आम्ही समजावून सांगतो. तुम्ही कोणतीही चिंता करू नका,” असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर ५ जून रोजी विनोद गायकवाड एका महिलेसह ममता फाऊंडेशनच्या कार्यालयात आला. “महापालिकेकडे दिलेली तक्रार परत घेतो, काळजी करू नका,” असे सांगून तो निघून गेला. मात्र, त्यानंतर त्याने फिर्यादी यांच्या पत्नीला फोन करून, “महापालिकेत तक्रारी होऊ द्यायच्या नसतील आणि उर्वरित बांधकाम पाडले जाऊ नये असे वाटत असेल, तर १० लाख रुपये द्यावे लागतील,” अशी मागणी केली.
यानंतर १० जून रोजी किनारा हॉटेलमध्ये भेटण्याचे ठरले. तेथे येताना घड्याळ आणण्यास सांगण्यात आले. त्यानुसार फिर्यादी यांनी त्याला घड्याळ दिले. त्या वेळी त्याच्यासोबत वकील निलेश कुंभार उपस्थित होता. त्यांनी सुरुवातीला चार लाख रुपयांची मागणी केली. टोकन म्हणून विनोद गायकवाड याने गुगल पेद्वारे १० हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर आणखी ५ हजार रुपयेही घेतले.
त्यानंतर फिर्यादी त्याचे फोन टाळू लागले. २२ जून रोजी विनोद गायकवाड व त्याचे साथीदार बांधकामस्थळी आले. त्यांनी फिर्यादी यांच्या मित्र काळे यांच्या पत्नीला धमकावत, “आजच काही रक्कम द्या, अन्यथा सर्व बांधकाम पाडून टाकीन आणि तुम्हाला येथून हाकलून लावीन,” अशी धमकी दिली. या भीतीपोटी फिर्यादी यांनी त्याच दिवशी रात्री गुगल पेद्वारे आणखी १० हजार रुपये पाठविले.
यानंतर त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सापळा रचला. विनोद गायकवाड याने फिर्यादींना ५० हजार रुपये घेऊन किनारा हॉटेल येथे बोलावले. तेथे ५० हजार रुपये स्वीकारताना पोलिसांनी विनोद गायकवाडसह तिघांना रंगेहात पकडले. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते करीत आहेत.
महापालिकेचे खंडणीखोरांना आशीर्वाद?
मांगडेवाडी परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असताना केवळ ममता फाऊंडेशनच्या बांधकामावरच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. या कारवाईमुळे संस्थेचे सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा फिर्यादींनी केला आहे. इतर कोणत्याही बांधकामावर कारवाई न करता केवळ सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेलाच लक्ष्य करण्यात आल्याने या कारवाईबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
