वाकड, दुबईत एकाच वेळी बिष्णोई टोळीचा कॉल
उद्योजक पती-पत्नीकडे मागितली ५ कोटींची खंडणी : पुण्यातील तिसऱ्या व्यावसायिकालाही धमकी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बिष्णोई टोळीने अमेरिकेतील व्हर्जिनिया येथून पुण्यातील उद्योजकांना फोन करून ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिष्णोई टोळीने वाकड आणि दुबई येथे एकाच वेळी उद्योजक पती-पत्नीकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली. पैसे दिले नाहीत तर संपूर्ण कुटुंब संपवून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे. पुण्यातील तिसऱ्या व्यावसायिकालाही खंडणीसाठी धमकावण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील पार्क स्ट्रीट या अत्यंत उच्चभ्रू सोसायटीत ३४ वर्षीय महिला राहते. तिचे पती व्यावसायिक कारणामुळे सध्या दुबई येथे आहेत.
दोघेही उद्योजक आहेत. बुधवारी रात्री दोघांनाही परदेशातून फोन करण्यात आला. त्यांच्याकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली.
पैसे दिले नाहीत तर त्यांचे कुटुंब संपवून टाकण्याची धमकी देण्यात आली. त्यांनी तातडीने पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
उद्योजक, व्यावसायिकांमध्ये दहशत – बिष्णोई टोळीकडून देशभरातील विविध शहरांतील मोठ्या उद्योजक व व्यावसायिकांना परदेशातून फोन करून खंडणीसाठी धमकावले जात आहे. यापूर्वी रावेत येथील एका व्यावसायिकाकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. त्याने नकार दिल्यानंतर त्याच्या दुकानावर गोळीबार करण्यात आला होता. तसेच, पुण्यातील मंतरवाडी येथील एका स्टील व्यावसायिकाला फोन करून ५० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. हा व्यावसायिक तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला असताना त्याच्या बंद दुकानावर स्थानिक गुंडांकडून गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर खंडणी मागण्याचा हा तिसरा प्रकार आहे.
परदेशातून बिष्णोई गँगकडून अशा प्रकारे खंडणीसाठी धमक्या दिल्या जात आहेत. या कुटुंबाला आलेला कॉल अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यातून आला होता. लोकांमध्ये दहशत निर्माण करून खंडणी उकळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरू आहे. या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. – रोहिदास पवार, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड पोलीस
