आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

श्री पूना गुजराती बंधू समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ उत्साहात संपन्न

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 29, 2026
Spread the love

पुणे : श्री पूना गुजराती बंधू समाजातर्फे दहावी, बारावी तसेच उच्चशिक्षणामध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभाचे आयोजन कोंढवा येथील जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये करण्यात आले. या समारंभात विश्वकर्मा ग्रुपचे अध्यक्ष व महालक्ष्मी मंदिराचे ट्रस्टी भरत अग्रवाल यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी श्री पूना गुजराती बंधू समाजाचे अध्यक्ष जयंत शहा, कार्यकारी संचालक डॉ. राजेश शहा, सहकार्यकारी संचालक नैनेश नंदू, सचिव राजेंद्र शहा, खजिनदार हरेश शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

समारंभात दहावी, बारावी आणि उच्चशिक्षणामध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना भरत अग्रवाल यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.

यावर्षीपासून विशेष क्रीडा श्रेणीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना भरत अग्रवाल म्हणाले की, समाजमाध्यमे अनेकदा तरुणांची विचारप्रक्रिया कुंठित करून त्यांच्या विचारांची दिशा भरकटवण्याचे काम करतात.

त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर सुजाणपणे करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे, आपण तंत्रज्ञानासाठी नाही, याची जाणीव प्रत्येक तरुणाने ठेवली पाहिजे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण व्यवस्थेत अभूतपूर्व लवचिकता निर्माण झाली असून, त्याचा लाभ घेत व्यवसाय आणि छंद यांची योग्य सांगड घालणे गरजेचे आहे.

निश्चित ध्येय ठेवून सातत्याने प्रयत्न केल्यास संकल्पपूर्ती निश्चित होते. भूतकाळातील अपयश विसरून यशावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

डॉ. राजेश शहा म्हणाले की, गुजरात समाज हा उद्योगशील समाज म्हणून देशभर परिचित आहे. उद्योगक्षेत्रात सचोटीने कार्य करून नाव कमावणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्या समाजात आहेत.

भविष्यात उद्योगासोबत शिक्षणाची जोड देत बौद्धिक क्षेत्रातही समाजाने आदर्श निर्माण करावेत. यशाला मर्यादा नसतात. एक ध्येय गाठल्यानंतर पुढील ध्येय आपल्याला सतत प्रेरणा देत असते आणि ही प्रक्रिया अखंड सुरू राहणारी असते, असे त्यांनी सांगितले.

या समारंभाला ट्रस्टी हेमंत मेहता, जनक शहा, केतन कापडिया, विनोद देडिया, दिलीप मेहता, हंसा शहा तसेच सर्व विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी नैनेश नंदू यांनी स्वागत करून उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला. राजेंद्र शहा यांनी आभार प्रदर्शन केले, तर अनुजा सेलोट यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले.