HSRP नंबर प्लेट नसल्यास आता कारवाई अटळ!
१ जुलैपासून राज्यभर विशेष मोहीम : वाहनधारकांना १,००० पर्यंत दंड
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्रातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसविण्याची अंतिम मुदत आज, ३० जून रोजी संपुष्टात आली आहे. राज्य परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, १ जुलैपासून HSRP नसलेल्या वाहनांविरुद्ध राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना १,००० पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
HSRP ही विशेष सुरक्षा वैशिष्ट्यांनी युक्त क्रमांक प्लेट असून, तिच्यामध्ये छेडछाड करणे अत्यंत कठीण असते. या प्लेटवर लेझर-कोड, क्रोमियम-आधारित होलोग्राम आणि वाहनाची ओळख पटविणारी विशिष्ट माहिती समाविष्ट असते.
वाहन चोरी, बनावट क्रमांक प्लेटचा वापर आणि गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने ही प्रणाली अनिवार्य केली आहे.
परिवहन विभागाच्या माहितीनुसार, मुदत संपल्यानंतर वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (RTO) अधिकारी संयुक्तपणे राज्यभर तपासणी मोहीम राबविणार आहेत.
HSRP न बसविलेल्या वाहनधारकांना दंडासह RTO मधील काही महत्त्वाच्या सेवांचा लाभ घेण्यातही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
मात्र, ज्यांनी ३० जूनपूर्वी अधिकृत पोर्टलवर नोंदणी करून HSRP बसविण्यासाठी अपॉइंटमेंट घेतली आहे, अशा वाहनधारकांना तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे.
राज्य सरकारने HSRP बसविण्यासाठी अधिकृत शुल्कही निश्चित केले आहे. त्यानुसार दुचाकी वाहनांसाठी ४५०, तीनचाकी वाहनांसाठी ५००, तर कार आणि इतर हलक्या मोटार वाहनांसाठी ७४५ (GST वगळून) शुल्क आकारण्यात येणार आहे.
दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी सर्व वाहनधारकांनी शक्य तितक्या लवकर HSRP बसवून घेण्याचे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.
