आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

व्यावसायिकाला खंडणी मागणार्‍या सावकारावर गुन्हा दाखल

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 3, 2026
Spread the love

पुणे : व्यवसायासाठी वेळोवेळी ४० लाख रुपये व्याजाने देऊन त्याच्या बदल्यात ३ कोटी ३० लाख रुपयांची खंडणी मागणे, बंदुकीचा धाक दाखवणे आणि अल्पवयीन मुलांकडून व्यावसायिकाचा खून करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. वाघोली पोलिसांनी या सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत दरिउस साइरस वाचमेकर (वय ५३, रा. विजय विहार, वाघोली) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी महेश गायकवाड (रा. मुंढवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १५ डिसेंबर २०२५ पासून सुरू होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरिउस वाचमेकर यांचा शेतमाल खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. व्यवसायासाठी त्यांना पैशांची गरज होती. त्यांचा मित्र किरण गुंजाळ याच्या ओळखीने त्यांचा महेश गायकवाड याच्याशी संपर्क झाला. महेश गायकवाड हा फिर्यादी यांच्या घरी आला. घर पाहिल्यानंतर त्याने, “मी तुम्हाला ४ लाख रुपये देईन. मात्र, स्टॅम्प पेपरवर ५ लाख रुपये घेतल्याचे लिहून द्यावे लागेल, तसेच तुमच्या फ्लॅटची कागदपत्रे द्यावी लागतील,” असे सांगितले.

त्यानंतर त्याने २० डिसेंबर २०२५ रोजी चंदननगर भाजी मंडई येथे फिर्यादींना ४ लाख रुपये दिले. त्याबदल्यात स्टॅम्प पेपरवर ५ लाख रुपये घेतल्याचे तसेच ते १५ जानेवारी २०२६ रोजी परत करण्याचे लिहून घेतले. मात्र, १५ जानेवारीला पैसे परत करता न आल्याने महेश गायकवाड याने त्यांच्याकडून ५ लाख ५० हजार रुपये घेतले.

त्यानंतर २० जानेवारी रोजी फिर्यादींना आणखी ५ लाख रुपयांची गरज होती. त्याने पुन्हा ५ लाख रुपये दिले. त्यानंतर वेळोवेळी ३ लाख रुपये आणि ५ लाख रुपये दिले. मात्र, त्यावेळी गायकवाड याने स्टॅम्प पेपरवर १ कोटी रुपये घेतल्याचे लिहून देण्यास सांगितले. त्यावर फिर्यादींनी, “तू फक्त ८ लाख रुपये दिले आहेत,” असे सांगितले. तेव्हा त्याने दुचाकीच्या डिकीत ठेवलेल्या दोन बंदुका दाखवून, “जर लिहून दिले नाही तर तुला इथेच उडवून टाकीन,” अशी धमकी दिली.

भीतीपोटी फिर्यादींनी १० जून २०२६ रोजी त्याला १ कोटी ४० लाख रुपये देणार असल्याचे तसेच पैसे दिले नाहीत तर मगरपट्टा येथील फ्लॅटचा ताबा घेईल, असे स्टॅम्प पेपरवर लिहून दिले. त्यानंतर त्यांनी अमित कन्स्ट्रक्शनचे मालक अमित थोरात यांच्याकडून २७ लाख रुपये घेतले. त्यांच्या व्यवहारातील मध्यस्थ किरण गुंजाळ याने धमकावून जबरदस्तीने फिर्यादींच्या फ्लॅटची चावी घेऊन गेला.

यानंतर महेश गायकवाड याने फिर्यादींना बोलावून, “आतापर्यंत माझ्याकडून घेतलेले १३ लाख रुपये आणि अमित थोरात यांच्याकडून घेतलेले २७ लाख रुपये, अशा एकूण ४० लाख रुपयांच्या बदल्यात मला ३ कोटी ३० लाख रुपये द्यावे लागतील. पैसे दिले नाहीत तर तुला आणि तुझा मित्र किरण गुंजाळ यांना अल्पवयीन मुलांकडून ठार मारून टाकीन,” अशी धमकी दिली.

त्यानंतर तो ट्रिलियम सोसायटी येथील फिर्यादींच्या फ्लॅटवर गेला. तेथे फिर्यादींचे मेव्हणे कर्नल सुशीलकुमार तिवारी यांच्या पत्नी तन्नू तिवारी यांना धमकावून, “उद्या घर खाली करा, मी ताबा घेणार आहे,” असे सांगून निघून गेला.

फिर्यादींकडून ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर जबरदस्तीने १ कोटी रुपये रोख घेतल्याचे तसेच त्याबदल्यात १ कोटी ४० लाख रुपये परत देणार, अन्यथा फिर्यादींची मालमत्ता जप्त करणार, असे लिहून घेतल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर फिर्यादींनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक चंदन करीत आहेत.