आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

‘डिजिटल अ‍ॅरेस्ट’ची भीती दाखवून ७४ लाखांची फसवणूक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 3, 2026
Spread the love

पुणे : ‘डिजिटल अ‍ॅरेस्ट’ असे काही नसते, असा सरकारकडून मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचा प्रचार केला जात असला तरी ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांत काहीही घट होताना दिसत नाही. अटकेची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची ७४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत ७१ वर्षीय एका ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक कोथरूड परिसरात राहतात. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधून पोलीस असल्याची बतावणी केली.

तुमच्या बँक खात्याचा वापर मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात झाला असून, या प्रकरणात तुम्हाला अटक करण्यात येणार असल्याची भीती चोरट्यांनी त्यांना दाखवली. तसेच, या प्रकाराची माहिती कोणालाही देऊ नये, असेही सांगितले. अटकेची कारवाई टाळण्यासाठी तातडीने त्यांच्या सांगण्यानुसार बँक खात्यात पैसे जमा करावे लागतील, असेही चोरट्यांनी सांगितले.

त्यानंतर फिर्यादींनी चोरट्यांनी सांगितलेल्या खात्यांमध्ये वेळोवेळी ७४ लाख रुपये जमा केले. पैसे जमा झाल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संगीता देवकाते करीत आहेत.

गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची ५५ लाखांची फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची ५५ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ६३ वर्षीय एका ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कर्वेनगर परिसरात राहतात. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. विविध गुंतवणूक योजनांची माहिती देत त्यांना जाळ्यात ओढले. त्यानंतर फिर्यादींनी चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा केले. चोरट्यांनी त्यांना परतावा मिळाल्याचा आभास निर्माण केला; मात्र प्रत्यक्षात कोणताही परतावा दिला नाही. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे करीत आहेत.