डॉक्टर्स डे निमित्त ‘बार्शी आरोग्यदूत गौरव २०२६’ मध्ये १६ मान्यवर डॉक्टरांचा गौरव
लिओ लायन्स क्लब बार्शी टाउन युथचा स्तुत्य उपक्रम
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : लिओ लायन्स क्लब बार्शी टाउन युथ यांच्या वतीने डॉक्टर्स डे निमित्त ‘बार्शी आरोग्यदूत गौरव २०२६’ सन्मान सोहळा श्री रामभाई शाह रक्तपेढी, बार्शी येथील सभागृहात उत्साहात पार पडला. समाजाच्या आरोग्यसेवेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, त्यांच्या निःस्वार्थ सेवाभावाचा गौरव करणे आणि युवा पिढीसमोर त्यांच्या कार्याचा आदर्श निर्माण करणे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बी. वाय. यादव होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप झाल्टे, तर प्रमुख उपस्थिती म्हणून झोन चेअरमन लायन अर्चना आवटे आणि लिओ डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन लायन प्रकाश फुरडे उपस्थित होते.
प्रास्ताविकात क्लबचे अध्यक्ष लिओ लायन पवन श्रीश्रीमाळ यांनी समाजात अनेक क्षेत्रांतील व्यक्ती आपापले योगदान देत असतात; मात्र डॉक्टर हे असे व्यक्तिमत्त्व आहे जे जन्मापासून जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेले असते.
रुग्णांच्या वेदना कमी करून त्यांना नवजीवन देण्यासाठी डॉक्टर दिवस-रात्र कार्यरत असतात. त्यांच्या निःस्वार्थ सेवाभावाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व बार्शीतील वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘बार्शी आरोग्यदूत गौरव २०२६’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सन्मानार्थींच्या मनोगतात बालरोगतज्ज्ञ डॉ. सुनील पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. स्मिता यादव आणि आयएमएचे अध्यक्ष तथा अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. एम. ए. शेख यांनी मार्गदर्शन केले. डॉ. सुनील पाटील यांनी डॉक्टर-रुग्ण यांच्यातील विश्वासाचे नाते अधोरेखित करत, “आज आरोग्यदूतांचा सन्मान शांतीदूतांच्या हस्ते होत आहे,” असे म्हणत पोलीस विभागाच्या कार्याचे कौतुक केले.
डॉ. स्मिता यादव यांनी महिलांच्या व बालकांच्या आरोग्यासोबतच ‘पोस्को’ कायद्याबाबत जनजागृतीची गरज व्यक्त केली. डॉ. एम. ए. शेख यांनी आजच्या काळात युवक समाजसेवेसाठी एकत्र येत असल्याचे कौतुक करत लिओ लायन्स क्लब च्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
लायन प्रकाश फुरडे यांनी गेल्या पाच वर्षांत लिओ क्लबने राबविलेल्या विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमांचा आढावा घेत अधिक व्यापक समाजसेवेच्या उद्देशाने लिओ लायन्स क्लब बार्शी टाउन युथ ची स्थापना करण्यात आल्याचे सांगितले.
झोन चेअरमन लायन अर्चना आवटे यांनी सर्व डॉक्टरांना डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा देत मोठ्या संख्येने उपस्थित राहून सन्मान स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले तसेच भविष्यातही अशाच समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन केले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप झाल्टे यांनी सांगितले की, “शासकीय कामाच्या व्यस्ततेमुळे यंदा मला स्वतंत्रपणे डॉक्टरांना डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा देता आल्या नव्हत्या.
मात्र या लिओ लायन्स क्लब मुळे एकाच व्यासपीठावर उपस्थित सर्व डॉक्टरांना शुभेच्छा देण्याची संधी मिळाली. हा उपक्रम निश्चितच अभिनंदनीय आहे.” त्यांनी क्लबच्या सेवाभावी कार्याचेही कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित पोलीस निरीक्षक गणेश कुंभार हे शासकीय कामानिमित्त तातडीच्या बैठकीसाठी सोलापूर येथे जावे लागल्याने कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत.
त्यांनी पाठविलेला शुभेच्छा संदेश कार्यक्रमात वाचून दाखविण्यात आला. संदेशात त्यांनी अनुपस्थितीबद्दल दिलगिरी व्यक्त करत सर्व डॉक्टरांना डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या सेवाभावी कार्याला सलाम केला तसेच त्यांच्या कार्याला नेहमीच संपूर्ण पाठिंबा राहील, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी विविध वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १६ मान्यवर डॉक्टरांचा पारंपरिक फेटा, मोत्याची माळ आणि आकर्षक फ्रेममधील सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
(डॉ. विवेकानंद जानराव व डॉ. अमित पडवळ हे अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत.) अध्यक्षीय समारोपात डॉ. बी. वाय. यादव यांनी बार्शीच्या समृद्ध वैद्यकीय परंपरेचा आढावा घेत डॉ. हिरेमठ, डॉ. कश्यपि, डॉ. नेने आणि डॉ. काका – डॉ. नाना सामनगावकर यांसारख्या ज्येष्ठ डॉक्टरांच्या सेवाभावी कार्याची आठवण करून दिली.
त्यांच्या कार्यामुळे बार्शीची “डॉक्टर संस्कृती” राज्यभर आदराने ओळखली जाते, असे सांगत त्यांनी ही सेवाभावी परंपरा पुढील पिढीनेही जपावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वराज लोखंडे यांनी केले, तर उदयन सावंत यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्लबचे चे अध्यक्ष लिओ लायन पवन श्रीश्रीमाळ, उपाध्यक्ष यश कुंकूलोळ, सचिव उदयन सावंत, खजिनदार गौरव सुराणा, तसेच लिओ लायन यश मेहता, आदित्य सोनीग्रा, प्रथमेश पाठक, रोनक कुंकूलोळ, गौरी पाठक, विराग दोशी, सीए श्रेणीक गुंदेचा, सीए तेजस रायचूरकर आणि क्लबच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सन्मानित डॉक्टर –
फिजिशियन – डॉ. गणेश सातपुते
स्त्रीरोगतज्ज्ञ – डॉ. स्मिता यादव
बालरोगतज्ज्ञ – डॉ. सुनील पाटील
अस्थिरोगतज्ज्ञ – डॉ. एम. ए. शेख
नेत्ररोगतज्ज्ञ – डॉ. गजानन शेटे
दंतचिकित्सक – डॉ. अमोल सुराणा
कान-नाक-घसा तज्ज्ञ – डॉ. तरंग शहा
जनरल सर्जन – डॉ. अजित पोकळे
हृदयरोगतज्ज्ञ – डॉ. विकास खामकर
त्वचारोगतज्ज्ञ – डॉ. मिलिंद सलगर
कर्करोगतज्ज्ञ – डॉ. राहुल मांजरे
पॅथॉलॉजिस्ट – डॉ. गौरव साखरे
जनरल प्रॅक्टिशनर – डॉ. आनंद बलदोटा
लिओ-लायन्स क्लब मधील डॉक्टर –
होमिओपॅथिक – डॉ. वत्सल राठोड
दंतचिकित्सक – डॉ. युक्ता आदित्य सोनीग्रा
होमिओपॅथिक – डॉ. हर्षदा वत्सल राठोड
