आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बिश्नोई गँगचा सदस्य राजस्थानमधून जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 3, 2026
Spread the love

पुणे : अमेरिकेतील व्हर्जिनिया प्रांतातून बिश्नोई टोळीच्या नावाने पुण्यातील मंतरवाडी परिसरातील एका स्टील व्यापाऱ्याकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्यानंतर त्याच्या बंद दुकानावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणात गुन्हे शाखेने थेट राजस्थानमध्ये कारवाई करून एकाला ताब्यात घेतले आहे.

पवन राम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, राजस्थानमधील हनुमानगड येथून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या त्याची कसून चौकशी सुरू असून, त्याच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

पुण्यातील मंतरवाडी परिसरातील एका प्रसिद्ध स्टील दुकानाच्या मालकाकडे बिश्नोई गँगच्या नावाने तब्बल ५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा आरोप आहे. खंडणीसाठी दबाव निर्माण करण्याच्या उद्देशाने दोन आठवड्यांपूर्वी गँगशी संबंधित दोन साथीदारांनी गोदामावर येऊन हवेत गोळीबार केल्याची माहिती समोर आली होती. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

१८ जून रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास फुरसुंगी परिसरातील मंतरवाडी येथे एका व्यावसायिकाच्या कार्यालयाबाहेर गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून प्रवेशद्वाराजवळील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले.

याच दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित व्यक्तींनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला होता. या घटनेचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

या टोळीतील सदस्यांनी संबंधित स्टील व्यावसायिकाकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. तसेच, त्या व्यावसायिकाच्या इतर भागीदारांनाही पैसे द्यावे लागतील, अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.