आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना जन्मठेप

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 4, 2026
Spread the love

वाशिम : चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर पोलीस कोठडीत मारहाण झाल्याने बैग्या पवार या तरुणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी तब्बल १५ वर्षांनी न्यायालयाने निकाल दिला आहे. १० मे २०११ रोजी घडलेल्या या प्रकरणात वाशिम येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने तत्कालीन पोलीस निरीक्षकासह नऊ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा निर्णय दिला.

शिक्षा झालेल्यांमध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक माधव माणिकराव धांडे, पोलीस अंमलदार मदन पवार, शिवाजी खिल्लारी, पंजाब पाटकर, रमेश पवार, प्रकाश ताराम, नागोराव खंडके, अशोक वैद्य आणि वसंत जाधव यांचा समावेश आहे.

नेमके काय प्रकरण? सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथील बैग्या नैनू पवार आणि राजू शेषराव पवार या दोघांना रिसोड पोलिसांच्या पथकाने १० मे २०११ रोजी पहाटे साडेतीन वाजता ताब्यात घेतले.

त्यानंतर रिसोड पोलीस ठाण्यात दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत बैग्या पवार यांचा मृत्यू झाला, तर राजू पवार गंभीर जखमी झाले.

या प्रकरणी बैग्या पवार यांच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली. पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला.

सीआयडीचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक अन्वर शेख, उपअधीक्षक चव्हाण आणि त्यांच्या पथकाने खून व अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करून तपास केला.

या प्रकरणाचा अवघ्या ३३ दिवसांत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्यादरम्यान सहायक सरकारी वकील श्रीराम नारायणराव काळू यांनी ४७ साक्षीदारांची साक्ष नोंदवली.

कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नसताना कोठडीत अमानुष छळ करण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचा मुद्दा त्यांनी ठामपणे मांडला.

न्यायालयाने आरोपींना भारतीय दंड संहितेअंतर्गत खून, कबुली मिळवण्यासाठी छळ करणे, गंभीर दुखापत करणे, समान उद्देशाने गुन्हा करणे आणि गुन्हेगारी कट रचणे आदी गंभीर कलमांखाली दोषी ठरवले. या निकालामुळे बैग्या पवार यांच्या कुटुंबीयांना तब्बल १५ वर्षांनंतर न्याय मिळाला.