इंद्रायणीला पूर : आळंदीत येऊ नका, प्रशासनाचे वारकरी व भाविकांना तातडीचे आवाहन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
आळंदी : आषाढी वारी २०२६ निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदी येथे येणाऱ्या सर्व वारकरी, भाविक आणि नागरिकांना प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचे सार्वजनिक आवाहन केले आहे. इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले असून, सध्या आळंदी शहरात येणे सुरक्षित नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या वारकरी व भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे, त्यांनी ज्या ठिकाणी आहेत तेथेच सुरक्षित थांबावे आणि आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये.
परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत प्रशासनाच्या पुढील सूचनांची प्रतीक्षा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच सर्व नागरिकांनी प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. नदीपात्र, घाट परिसर तसेच पाण्याखाली गेलेल्या किंवा बंद करण्यात आलेल्या पुलांच्या परिसरात जाणे टाळावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असून, सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
परिस्थिती लक्षात घेता वारकरी व भाविकांनी स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे प्रशासनाने नमूद केले आहे.
