कासारसाई धरण ७५.६५ टक्के भरले
पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता : नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कासारसाई धरणाची पाणीसाठा पातळी झपाट्याने वाढत असून, धरण सध्या ७५.६५ टक्के क्षमतेने भरले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास किंवा धरणातील पाण्याची पातळी आणखी वाढल्यास परिस्थितीनुसार कासारसाई धरणाच्या सांडव्यावरून कासारसाई नालापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येऊ शकतो, अशी माहिती पुणे पाटबंधारे विभागाने दिली आहे.
पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता इंजि. दि. म. डुबल यांनी जारी केलेल्या सूचनेनुसार, संभाव्य पाण्याच्या विसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नदीपात्रात किंवा नाल्याच्या परिसरात जाणे पूर्णपणे टाळावे.
तसेच नदीपात्रात ठेवलेले कोणतेही साहित्य किंवा जनावरे असल्यास ती तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावीत. सखल भागातील नागरिकांना याबाबत त्वरित सूचना देऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून कोणताही धोका टाळावा, असेही पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. पावसाची परिस्थिती आणि धरणातील पाण्याची पातळी लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतले जाणार असून, नागरिकांनी अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवून सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
