आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

व्यावसायिकाकडे बिष्णोई गँगच्या नावाने खंडणी मागणारे जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 7, 2026
Spread the love

पुणे : बिष्णोई गँगच्या नावाने व्यावसायिकाकडे ५० कोटी रुपयांची खंडणी मागून त्यानंतर त्यांच्या कंपनीच्या गेटवर चार गोळ्या झाडून दहशत निर्माण करणाऱ्या चार जणांना गुन्हे शाखेच्या पथकांनी राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमधून अटक केली आहे.

पवन प्रकाशराम बारड (वय २४, रा. हनुमानगढ जंक्शन, हनुमानगड, राजस्थान), सत्यप्रकाश कालुराम शिलोरा (वय २५, रा. हांडेवाडी) आणि रवीकुमार राजेंद्रकुमार जांगडा (वय ३३, रा. घुकनवाडी, पानवाला मोटा, सिरसा, हरियाणा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

त्यांच्यासोबत एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. रवीकुमार जांगडा याच्याकडून एक गावठी पिस्तूल व १० काडतुसे, तर अल्पवयीन मुलाकडून दोन गावठी पिस्तुले व २० काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

२२ जून रोजी एका नामांकित व्यावसायिकाला व त्यांच्या सहकाऱ्यांना फोन करून ५० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या दोन तासांत कंपनीच्या गेटवर चार गोळ्या झाडून दहशत निर्माण करण्यात आली होती.

बिष्णोई गँगच्या नावाने ही खंडणी मागण्यात आली होती. गुन्हे शाखेच्या पथकांनी तांत्रिक विश्लेषण तसेच सुमारे एक हजार तासांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींची ओळख पटवली.

गुन्हा करून ते परराज्यात पळून गेल्याचे निष्पन्न झाले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेची स्वतंत्र पथके तयार करून ती हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि पंजाब येथे रवाना करण्यात आली.

तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पवन बारड याचे नाव समोर आले. तो फरार झाल्याने पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांकडे चौकशी केली.

तसेच त्याच्या दोन मैत्रिणींकडे चौकशी केल्यानंतर तो राजस्थानमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एका पथकाने हनुमानगड (राजस्थान) येथून त्याला अटक केली.

पवनकडे चौकशी केल्यानंतर सत्यप्रकाश शिलोरा याचे नाव समोर आले. तो फिर्यादी यांच्या स्टील कंपनीत कामाला होता. विशेष म्हणजे, घटना घडल्यानंतर पोलिसांनी कंपनीतील सर्व कामगारांना चौकशीसाठी बोलावले असता तोही त्यांच्यामध्ये उपस्थित होता. त्यानंतर पोलिसांनी ४ जुलै रोजी सत्यप्रकाश शिलोरा याला अटक केली.

त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर रवीकुमार जांगडा याचे नाव समोर आले. पवन बारडला अटक करण्यात आली तेव्हा रवीकुमारही त्याच लॉजमध्ये होता.

मात्र, तो अवघ्या १० मिनिटांपूर्वी तेथून निघून गेला होता. पवनला अटक झाल्याचे समजताच तो फरार झाला. राजस्थानमध्ये पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे समजल्यावर तो पंजाबमध्ये गेला.

त्यानंतर पंजाबमधील पथकाने मंगळवारी पहाटे भटिंडा येथून त्याला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत एका अल्पवयीन मुलालाही पकडण्यात आले.

सत्यप्रकाश हा व्यावसायिकाच्या कंपनीत काम करत होता, तर रवीकुमार पुण्यात ये-जा करत होता. संपूर्ण प्रकरणात रवीकुमार जांगडा हा सूत्रधार असल्याचे तपासात समोर आले आहे.

पवन बारड १९ जून रोजी पुण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी हा कट रचला. गोळीबार करून दोघेही तेथून पसार झाले होते.