जबरदस्तीने आयफोन चोरणारा चोरटा जेरबंद
शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी : आरोपीवर ३ दुचाकी चोरीचे गुन्हे
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कॅब बुक करण्यासाठी हातात मोबाईल घेतला असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने हातातील आयफोन १७ प्रो जबरदस्तीने हिसकावून नेला होता. शिवाजीनगर पोलिसांनी या चोरट्याला अवघ्या दोन तासांत जेरबंद केले.
आकाश सुरेश वाघीरे (वय २१, रा. दळवी हॉस्पिटलच्या बाजूला, शिवाजीनगर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून आयफोन आणि चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
यापूर्वी त्याच्याविरुद्ध विश्रामबाग आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. ही घटना १० जुलै रोजी सकाळी पावणेसात वाजता शिवाजीनगर येथील संचेती चौकात घडली होती.
निशांत लोखंडे (वय २४, रा. मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर) हे १० जुलै रोजी सकाळी पावणेसात वाजता संचेती चौकात मोबाईलवरून कॅब बुक करत होते.
त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या हातातील १ लाख ३७ हजार रुपये किमतीचा आयफोन १७ प्रो जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. लोखंडे यांनी याची माहिती तातडीने शिवाजीनगर पोलिसांना दिली.
सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील आणि तपास पथकातील अंमलदारांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळविले. त्यावरून गुप्त बातमीदारामार्फत आरोपीचा शोध सुरू करण्यात आला.
पोलीस हवालदार महावीर वलटे आणि पोलीस अंमलदार दीपक रोमांडे यांना गुन्ह्यात वापरलेली सुझुकी ॲक्सेस मोपेड घेऊन आरोपी वेताळबाबा चौकात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
पोलीस हवालदार भाऊ चव्हाण, महावीर वलटे, राजकिरण पवार, इसाक पठाण तसेच पोलीस अंमलदार दीपक रोमांडे, सचिन जाधव, श्रीकृष्ण सांगवे आणि श्रीकांत मखरे यांनी वेताळबाबा चौकात सापळा रचून आकाश वाघीरे याला पकडले.
त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे चोरीचा आयफोन मिळून आला. त्याच्याकडील दुचाकीची चौकशी केली असता ती चोरीची असल्याचे उघड झाले. या दुचाकीच्या चोरीप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचेही आढळून आले.
आरोपीकडून आयफोन आणि दुचाकी असा एकूण २ लाख ३७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी विश्रामबाग आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावळे आणि सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक अमर काळंगे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस हवालदार भाऊ चव्हाण, महावीर वलटे, राजकिरण पवार, इसाक पठाण तसेच पोलीस अंमलदार दीपक रोमांडे, सचिन जाधव, श्रीकृष्ण सांगवे आणि श्रीकांत मखरे यांनी केली.
