पोलीस निरीक्षकाचा दारूच्या नशेत पोलीस ठाण्यात धिंगाणा
सहकारनगर पोलीस ठाण्यातील घटना : गुन्हे निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : दारूच्या नशेत सहकारनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे निरीक्षकाने पहाटे पोलीस ठाण्यात येऊन एकच गोंधळ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
राजेश खांडवे असे या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. राजेश खांडवे यांची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात ते मद्याच्या अंमलाखाली असल्याचे आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजेश खांडवे हे सहकारनगर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक (गुन्हे) म्हणून कार्यरत आहेत. ते पहाटे २ वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यात आले. त्यावेळी ते दारूच्या नशेत होते. त्यांनी पोलीस ठाण्यात आरडाओरडा करत एकच गोंधळ घातला. पहाटे दोन ते अडीच वाजेपर्यंत हा गोंधळ सुरू होता.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी तातडीने सहकारनगर पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर राजेश खांडवे यांना आवरण्यात आले. या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली. त्यांना ससून रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात ते मद्याच्या अंमलाखाली असल्याचे आढळून आले. त्यानंतर शनिवारी सकाळी त्यांच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसच असे वागू लागले तर?
दोनच दिवसांपूर्वी एका पोलीस कर्मचाऱ्याने दारूच्या नशेत कोरेगाव पार्क येथील पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निवासस्थानाच्या मुख्य गेटला कारने धडक दिली होती. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी सुरक्षारक्षकांच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. अमोल वसंतराव भिसे याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर सहकारनगर पोलीस ठाण्यातील हा प्रकार समोर आला आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्यासारखे वरिष्ठ पोलीस अधिकारी थेट पोलीस ठाण्यात दारू पिऊन येतात आणि धिंगाणा घालतात. पोलीसच असे वागू लागले तर नागरिकांनी कोणाकडे पाहायचे? शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे काय होईल, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
