भवानी पेठेतील स्टील व्यापाऱ्याची ३० लाखांची फसवणूक
इंजिनिअर असल्याची बतावणी करुन घेतला उधारीवर माल : समर्थ पोलिसांनी दोघांवर केला गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : इंजिनिअर असल्याची बतावणी करून सुरुवातीला रोखीने व्यवहार करत विश्वास संपादन केला. त्यानंतर उधारीवर माल घेऊन भवानी पेठेतील स्टील व्यापाऱ्याची ३० लाख ९३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत राज रविराज सोलंकी (वय ३२, रा. सॅलसबरी पार्क, गुलटेकडी) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अभिजित चौगुले (रा. शिवणे) आणि ओम साई इलेक्ट्रिकलर्स अथवा हर्ष एंटरप्रायझेसच्या प्रोप्रायटर लता सतीश इंगळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना भवानी पेठेतील परफेक्ट स्टील्स अँड बिल्डिंग मटेरियल या दुकानात २४ नोव्हेंबर २०२५ ते ५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राज सोलंकी यांचे भवानी पेठेत स्टील आणि बिल्डिंग मटेरियल विक्रीचे दुकान आहे. २० नोव्हेंबर रोजी अभिजित चौगुले हा त्यांना दुकानात येऊन भेटला. मी सार्थक इन्फ्रा येथे इंजिनिअर म्हणून नोकरीला असताना या दुकानातून माल घेतला जात होता. मात्र, ती नोकरी सोडली असून आता मी ओम साई इलेक्ट्रिकलर्स या आंबेगाव येथील नवीन कंपनीत रुजू झालो आहे. कंपनीच्या नांदेड सिटी गेट, धायरी आणि पारी कंपनी रोड, नऱ्हे अशा तीन ठिकाणी साइट सुरू आहेत. त्या ठिकाणी दररोज मालाची आवश्यकता असते, असे त्याने सांगितले. कंपनीच्या प्रोप्रायटर लता सतीश इंगळे असल्याचे सांगून त्याने त्यांचा जीएसटी क्रमांक दिला.
अभिजित चौगुले याने जानेवारी २०२६ पर्यंत एकूण ९६ लाख ७४ हजार ६७७ रुपयांचा स्टीलचा माल खरेदी केला होता. सुरुवातीच्या व्यवहारांपोटी ६० लाख ८१ हजार ६५० रुपये वेळेवर देऊन त्याने विश्वास संपादन केला. त्यानंतर पेमेंट करण्यासाठी ७ ते १५ दिवसांची क्रेडिटवर व्यवहार करण्याची विनंती केली. यापूर्वीचे पेमेंट वेळेवर केले असल्याने सोलंकी यांनी ही विनंती मान्य केली.
त्यानंतर १७ डिसेंबर २०२५ रोजी त्याने कळविले की, त्याच्या फर्मचे नाव ओम साई इलेक्ट्रिकलर्सऐवजी हर्ष एंटरप्रायझेस असे करण्यात आले असून जीएसटी क्रमांक तोच आहे. ओम साई इलेक्ट्रिकलर्सच्या नावाने पहिले तीन व्यवहार केले होते. त्यानंतरचे व्यवहार हर्ष एंटरप्रायझेस या नावाने केले आहेत.
उर्वरित ३५ लाख ९३ हजार २७ रुपये देण्याची मागणी केल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे सोलंकी यांनी साइटवर जाऊन माहिती घेतली असता, त्या ठिकाणी ओम साई इलेक्ट्रिकलर्स अथवा हर्ष एंटरप्रायझेस या नावाने कोणत्याही फर्मचे काम सुरू नसल्याचे तसेच अभिजित चौगुले नावाचा कोणताही इंजिनिअर तेथे काम करत नसल्याचे समोर आले.
याबाबत चौगुले याच्याकडे विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली. तसेच वडारवाडीमध्ये येऊन पैसे घेऊन दाखव, अशी धमकी दिली.
सोलंकी यांनी लता इंगळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी चौगुले याला आपला जीएसटी क्रमांक आणि बँक खाते वापरण्यास दिले असल्याचे सांगितले. साइटवर माल उतरवून घेणाऱ्या स्वप्नील याच्याकडे विचारपूस केली असता, अभिजित चौगुले याने सांगितलेल्या ठिकाणी एका मोकळ्या प्लॉटवर हा माल वेळोवेळी उतरविण्यात आल्याचे त्याने सांगितले. मात्र, चौगुले याची साइट नेमकी कोठे सुरू आहे, याची कोणतीही माहिती नसल्याचेही त्याने स्पष्ट केले.
त्यानंतर सोलंकी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावेळी दरमहा पाच लाख रुपये याप्रमाणे उर्वरित रक्कम देण्याचे चौगुले याने मान्य केले. त्यानुसार त्याने पाच लाख रुपये दिले. मात्र, उर्वरित रकमेची मागणी केल्यावर त्याने शिवीगाळ करत पैसे देणार नाही, तुला काय करायचे ते कर, अशी धमकी दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पावणे तपास करीत आहेत.
