श्री पुना गुजराती बंधू समाजाची ‘दिवाळी पहाट’ उत्साहात आणि दिमाखात संपन्न
कोंढव्यातील कार्यक्रमाला २ हजारांहून अधिक रसिकांची उपस्थिती : गायक विवेक पांडे यांच्या सुरेल गीतांनी रंगली संगीताची मैफल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : श्री पुना गुजराती बंधू समाजाच्या वतीने कोंढव्यातील ‘जयराज स्पोर्ट्स ॲण्ड कन्व्हेन्शन सेंटर’च्या भव्य अनायास लॉनवर आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पहाटे ५.३० वाजता सुरू झालेल्या या संगीतमय कार्यक्रमाला तब्बल २ हजारांहून अधिक रसिक प्रेक्षकांनी उपस्थिती लावली. पुण्यातील सुप्रसिद्ध ‘नीलकंठ ज्वेलर्स’ यांनी या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारले होते.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष जयंत शहा, व्यवस्थापकीय संचालक राजेश शहा, उपव्यवस्थापकीय संचालक नैनेश नंदू, उपाध्यक्ष वल्लभ पटेल तसेच संस्थेचे विश्वस्त आणि दानशूर व्यक्ती यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
यावेळी राजेश शहा यांनी संस्थेचे सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, गायक-वादक कलाकार आणि उपस्थित रसिक प्रेक्षकांचे स्वागत केले.
या भव्य कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन संस्थेचे विश्वस्त दिलीप मेहता यांनी केले होते. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात आंतरराष्ट्रीय विक्रमधारक आणि सुप्रसिद्ध गायक विवेक पांडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह हिंदी आणि मराठीतील अजरामर गीतांचे सादरीकरण केले.
त्यांच्या सुमधुर गायनाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. संतूर, बासरी, सॅक्सोफोन, गिटार, बेस गिटार, की-बोर्ड, ऑक्टोपॅड, ढोलक, ढोलकी आणि तबला अशा विविध वाद्यांच्या सुरेल साथीने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली.
कलाकारांच्या अप्रतिम सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता जोगळेकर यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान विशेष लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. ‘फ्लॅमिंगो टूर्स’च्या वतीने उपस्थित रसिकांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती.
त्यामुळे कार्यक्रमातील उत्साहात आणखी भर पडली. संगीतमय मेजवानीनंतर उपस्थितांनी एकत्रितपणे चविष्ट अल्पोपहार आणि पारंपरिक दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला.
या सोहळ्याला संस्थेचे कोषाध्यक्ष सी.ए. हरेश शाह, सचिव राजेंद्र शाह यांच्यासह विश्वस्त मोहन गुजराती, जनक शाह, हंसा शहा, हिना शहा, पंकज कपाडिया, पंकज देडिया, विनोद देडिया, दीपक मेहता, अनुज गांधी, वृजेश शहा, केतन कपाडिया, हेमंत मेहता, संदीप शहा, क्रिती नागरेचा, सत्येन पटेल, बृजेन शाह उपस्थित होते.
तसेच ‘फ्लॅमिंगो टूर्स’चे शलाक शहा आणि युवराज शहा यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संगीत, उत्साह आणि दिवाळीच्या आनंदाने नटलेल्या या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाने पुणेकरांच्या दिवाळीच्या आनंदात आणखी भर घातली.
