१५ किलो चांदीसह ४५ लाख रुपये घेऊन कामगार फरार
मावस भावाच्या दुकानात देण्यास दिला होता ऐवज : फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मावस भावाच्या दुकानात देण्यासाठी दिलेली १५ किलो चांदी आणि २८ लाख ५ हजार रुपयांची रोकड घेऊन मोटारसायकलवरून निघालेला कामगार दुकानात न पोहोचता मोबाईल बंद करून ४४ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज घेऊन फरार झाला आहे.
याबाबत सचिन हनुमंत यादव (वय ३९, रा. मंगल भैरव अपार्टमेंट, नांदेड सिटी) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी योगेंद्रसिंह गजेंद्रसिंह राठोड (वय २८, रा. धनियावाडा, जि. बनासकांठा, गुजरात) या कामगाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवार पेठेतील दुकानात ५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे रविवार पेठेत एस. व्ही. आर. सिल्व्हर नावाने सोने-चांदीचे दुकान आहे. या दुकानात राठोड हा गेल्या दोन वर्षांपासून कामगार म्हणून काम करतो.
दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम इतर व्यापाऱ्यांकडे घेऊन जाणे-आणणे, असे काम तो करीत असे. फिर्यादी यांचा नांदेड सिटी येथे सोने-चांदी गलाईचा कारखाना आहे.
दुकानात गलाईसाठी आलेले सोने व चांदी कारखान्यात शुद्ध करून ग्राहकांना परत दिले जाते. आवश्यकतेनुसार शुद्ध केलेले सोने-चांदी ते त्यांचे मावसभाऊ प्रकाश रामचंद्र सूर्यवंशी यांच्या रविवार पेठेतील एस. बी. आर. सिल्व्हर या दुकानातून घेत असतात.
५ नोव्हेंबर रोजी फिर्यादी दुकानात असताना त्यांचे नेहमीचे ग्राहक सागर कोकाटे दुकानात आले. त्यांनी मोडीचे गाळून आणलेले १५ किलो १०० ग्रॅम वजनाचे चांदीचे पाच बार आणले होते.
तसेच शुद्ध चांदी खरेदी करण्यासाठी २८ लाख ५ हजार रुपये रोख आणले होते. फिर्यादी यांनी कोकाटे यांच्याकडून चांदीचे बार आणि रोकड घेऊन ती योगेंद्रसिंह राठोड याच्याकडे दिली.
मावसभाऊ सूर्यवंशी यांच्याकडून एकूण २४ किलो शुद्ध चांदी आणण्यासाठी त्याला दुचाकीवरून दुपारी पावणे दोन वाजता पाठविले.
राठोड जाऊन बराच वेळ झाला तरी परत आला नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी मावसभाऊ प्रकाश सूर्यवंशी यांना फोन केला. त्यांनी राठोड दुकानात आलाच नसल्याचे सांगितले.
त्यानंतर फिर्यादी यांनी राठोडला फोन केला असता त्याचा मोबाईल बंद असल्याचे आढळले. परिसरात शोध घेऊनही तो मिळून आला नाही.
त्यानंतर राठोड हा आपल्याकडे दिलेली १५ किलो १०० ग्रॅम चांदी आणि २८ लाख ५ हजार रुपये असा एकूण ४४ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज घेऊन फरार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यानंतर त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक पद्माकर पाटील तपास करीत आहेत.
