आयफोन चोरणाऱ्या टोळीला पाठलाग करून पकडले
पालखी दर्शनासाठी आलेल्या ज्येष्ठाची फसवणूक : साध्या वेशातील पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पालखी दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अनेक चोरटे या काळात सक्रिय होत असतात. हे लक्षात घेऊन पोलिसांनी साध्या वेशातील कर्मचाऱ्यांचा पहारा ठेवला होता. हडपसर येथील सोलापूर रोडवर पालखी दर्शनासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या खिशातील आयफोन चोरणाऱ्या टोळीला साध्या वेशातील पोलिसांनी पाठलाग करून पकडले. दोन चोरट्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत अविनाश गोविंद नीलकंठ (वय ६०, रा. वायरलेस कॉलनी, औंध) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी तेजस राजेश गुंजाळ (वय १९, रा. अप्पर इंदिरानगर) आणि शिवदर्शन जनार्दन महतो (वय १९, रा. थाना, तीन पहाड, जि. साहिबगंज, झारखंड) यांना अटक केली आहे. हा प्रकार सोलापूर रोडवरील शंकर मठ येथील रामनाथ फरसाण मार्टसमोर ११ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश नीलकंठ हे पालखी दर्शनासाठी रस्त्याच्या कडेला उभे होते. रस्त्यावर गर्दी असताना आरोपींनी त्यांच्या पँटच्या पुढील खिशातून मोबाईल काढून घेतला. हा प्रकार त्यांच्या लक्षात येताच त्यांनी ‘चोर, चोर’ असा आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून तिघे जण पळून जाऊ लागले. त्या वेळी तेथे साध्या वेशात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी पाठलाग करून तिघांना पकडले. त्यांच्याकडे फिर्यादीचा मोबाईल मिळून आला. पोलीस उपनिरीक्षक शशिकांत लोंढे तपास करीत आहेत.
पालखी बंदोबस्त दरम्यान ९९ ताब्यात
पालखी बंदोबस्तादरम्यान सोनसाखळी चोरीचे ५ आणि मोबाईल चोरीचा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनसाखळी चोरीचे गुन्हे मांजरी, समर्थ, खडकी, शिवाजीनगर आणि हडपसर पोलीस ठाण्यांत दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी समर्थ आणि वानवडी येथील गुन्ह्यांतील चोरट्यांना पकडण्यात आले आहे. गुन्हे शाखेने संपूर्ण पालखी बंदोबस्तादरम्यान ७९ महिला आणि २० पुरुष अशा एकूण ९९ संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली आहे.
