फार्मासिस्टने डॉक्टरांना घातला पाऊण कोटींचा गंडा
स्वतःच्या क्यूआर कोडवर घेतले पैसे; रोख रकमेवरही मारला डल्ला
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मेडिकल दुकानात काम करणाऱ्या फार्मासिस्टने स्वतःच्या बँक खात्याच्या क्यूआर कोडवर पैसे स्वीकारत तसेच रोख विक्रीतील रक्कम हडप करून एका डॉक्टरांची तब्बल ७३ लाख २१ हजार ७९४ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी डॉ. शिवदर्शन मोहनलाल अगरवाल (वय ५१, रा. शिवम बंगला, प्राधिकरण, निगडी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिग्विजयसिंग प्रविणसिंग राजपूत (रा. संतोषनगर, ताथवडे, वाकड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे सौदागर येथील लोटस ड्रग स्टोअरमध्ये १ जानेवारी २०१९ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. अगरवाल यांचे पिंपळे सौदागर येथे लोटस ड्रग स्टोअर असून त्यांनी दिग्विजयसिंग राजपूत याला फार्मासिस्ट म्हणून कामावर ठेवले होते. राजपूत याने विश्वास संपादन केल्यामुळे डॉक्टरांनी स्टोअरचा सर्व कारभार त्याच्यावर सोपविला होता.
याचाच गैरफायदा घेत त्याने २०१९ ते २०२६ या कालावधीत दुकानात औषधे खरेदीसाठी आलेल्या काही ग्राहकांना मेडिकल स्टोअरचा क्यूआर कोड देण्याऐवजी स्वतःच्या बँक खात्याचा क्यूआर कोड दिला. त्याद्वारे त्याने ५२ लाख ५४ हजार ५३२ रुपये स्वतःच्या बँक खात्यात जमा करून घेतले.
तसेच मेडिकलमधील रोख विक्रीतील ३३ लाख ६० हजार ७६५ रुपये स्वतःकडे ठेवून त्याने एकूण ७३ लाख २१ हजार ७९४ रुपयांचा अपहार करून फसवणूक केली. मेडिकल स्टोअरच्या व्यवहारात तफावत आढळू लागल्याने डॉ. अगरवाल यांनी स्टोअरचे लेखापरीक्षण केले असता हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नारायण पाटील करीत आहेत.
