आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मांजरीतील आराध्या ज्वेलर्स फोडून अडीच कोटींची चोरी

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 14, 2026
Spread the love

पुणे : मांजरी येथील मुंढवा-मांजरी रोडवर असलेल्या आराध्या ज्वेलर्स या सराफी दुकानाच्या मागील भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील तब्बल २११ ग्रॅम सोन्याचे व ९४ किलो चांदीचे दागिने असा एकूण २ कोटी ५५ लाख ७४ हजार ४५५ रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.

याबाबत दुकानाचे मालक शंकरलाल देवाजी माली (वय ३९, रा. वाघोली) यांनी मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना मुंढवा-मांजरी रोडवरील म्हसोबा मंदिरासमोरील अ‍ॅव्हेन्यू कॉम्प्लेक्समध्ये १३ जुलैच्या पहाटे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी येथील मुंढवा रोडवरील म्हसोबा वस्तीमधील अ‍ॅव्हेन्यू कॉम्प्लेक्स येथे आराध्या ज्वेलर्स हे सराफी दुकान आहे.

सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी प्रथम सराफी दुकानालगतच्या पार्किंगमधील सुरक्षा रक्षकाच्या बंद खोलीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

त्यानंतर खोलीलगत असलेल्या सराफी दुकानातील बाथरूमच्या भिंतीला दीड फूट व्यासाचे भगदाड पाडले. त्यातून आत प्रवेश करून त्यांनी दुकानाचा दरवाजा तोडला.

शोकेसमधील २११ ग्रॅम सोन्याचे आणि ९४ किलो चांदीचे दागिने तसेच ५० हजार रुपयांची रोकड असा एकूण २ कोटी ५५ लाख ७४ हजार ४५५ रुपयांचा ऐवज चोरून नेला.

सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास शंकरलाल माली यांनी दुकान उघडल्यानंतर त्यांना शोकेसमध्ये दागिने दिसले नाहीत. आत गेल्यावर त्यांना मागील भिंतीला पाडलेले भगदाड दिसले.

चोरटे गॅस सिलिंडर, हातोडी, गॅस कटर असे सर्व साहित्य दुकानातच ठेवून दागिने घेऊन पळून गेले होते. मांजरी पोलिसांना ही माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम, पोलीस निरीक्षक इरफान नदाफ आणि पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्याद्वारे चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक इरफान नदाफ तपास करीत आहेत.